रत्नागिरीचे पक्षी वैभव
रत्नागिरीतील पक्षी वैभव.....
रत्नागिरी सह्य पर्वताची शिखरे आणि अरबी समुद्राच्या लाटांनी वेढलेला भूप्रदेश. पावसाळ्यात कोसळणाऱ्या मान्सून सरी इथल्या धरतीला उपजाऊ बनवतात तर सह्याद्रीच्या खोऱ्यात उगवणाऱ्या नद्या सिंचन करून भागाभागात जीवन फुलवतात. याच सह्याद्रीच्या खोऱ्यात सदाहरित, निम सदाहरित, पानगळी आणि शुष्क अश्या प्रकारची वनराई वर्षांनुवर्षे तग धरून आहे. नागरी वस्त्यांचे अतिक्रमण झेलत सुद्धा अजूनही अनेक वने टिकून आहेत तर शहरांमध्ये नारळी पोफळी आणि इतर फळबागा कोकणाला हिरवेगार गालिचे प्रदान करतात. जसं जसे समुद्र किनारे जवळ येऊ लागतात तस तसे सडे, वाळूचे किनारे आणि विस्तीर्ण गवताळ मैदाने सुद्धा दिसून येतात. इतक्या मोठ्या प्रमाणात असणारी अधिवासीय विविधता अर्थातच अतुलनीय जैव विविधतेला जन्म देते आणि कोकणच्या मध्यभागी वसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या पक्षी जीवनाला वैविध्यपूर्ण बनवते. पक्षी सप्ताहानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षी जीवनाचा आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करूया….
कोकणचे ग्राम जीवन मुख्यतः प्रथा परंपरा आणि देवळे यांनी साकारलेले. प्रत्येक गावाचे एक ग्राम दैवत गावाच्या हद्दीत वसलेले आहे. पूर्वजांनी ही देवळे वसवताना राई उभारल्या आणि अनेक दुर्मिळ वनस्पती आणि वृक्षांना या देवराई मध्ये स्थान दिले. शेकडो वर्षे जुन्या देवराई आज संपूर्ण जिल्ह्यात विकासाचे घाव सोसत आजही उभ्या आहेत आणि टिकून राहिलेले पुरातन वृक्ष ग्रेट हॉर्नबिल सारख्या पक्ष्याचे शेवटचे आश्रयस्थान बनले आहेत. जंगलचे शेतकरी म्हणून ओळखले जाणारे हे विहंग शिंगासारखी चोच आणि पंखांचा लांबवरून येणार आवाज याने सहज ओळखता येतात. मुख्यतः फलाहारी असणारे हॉर्नबिल बिजप्रसाराचे कार्य करत या रायांच्या सीमा वाढवतात. इंडियन ग्रे, मलबार पाईड आणि मलबार ग्रे हे हॉर्नबिल सुद्धा जिल्ह्यात आढळतात. देवराई मधील बेहडा वृक्ष अनेक ढोल्यानी युक्त असतात. याच ढोल्या पोपट, पिंगळा, मैना यांची आश्रयस्थाने आहेत. तर तांबट, सुतारपक्षी या झाडांची पोखरण करून गुजारा करतात. तर हळद्या, बुलबुल, सातभाई, दयाळ, सुभग, चीरक, चिमण्या, मुनिया झुडपी आणि विरळ झाडीत दिसून येतात. विस्तीर्ण माळराने आणि कातळाचे सडे हे सुद्धा कोकणचे वैशिष्टय. पावसाळी फुलोऱ्याने बहरणारे इथले जीवन पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. पावसाचे पाणी भेगा, तळी यात साठून डबकी बनवते आणि याच डबक्यात बेडके, कीटक उभयचर यांचे जीवनक्रम सुरू होतात. त्यामुळे खाद्याची प्रचंड उपलब्धता झाल्याने बगळे, वंचक, पाण कावळे, करकोचे, शराटी असे पक्षी पाणथळ भागात मिळतात तर खंड्या, घारी, गरुड, ससाणे, हारीयर असे शिकारी पक्षी सुद्धा दिसून येतात. राष्ट्रीय पक्षी मोराचे नृत्य हे तर या सड्यांचे वैभव तसेच समुद्री भागात प्लोवर, टिटवी, ल्हावे, तूत्वार, धोबी दिसून येतात. हिवाळा सुरू झाला की अनेक स्थलांतरित पक्षी समुद्र काठाची उबदार हवा आणि विपुल खाद्य जत्रेचा आनंद लुटण्यासाठी दाखल होतात. कदाचित समुद्रात उठणारी वादळे अनेक वेळेला बुबी सारखे पक्षी सुद्धा किनाऱ्यावर आणून सोडतात.
समुद्र किनाऱ्यांवर असणाऱ्या सुरूच्या बनावर अधिराज्य कोण गाजवत असेल तर तो आहे पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुड. विस्तीर्ण पंखांची भरारी घेऊन लाटंतून अलगद समुद्री जीव पकडणारा सागरी गरुड रत्नागिरीच्या किनाऱ्याची शान आहे. समुद्र काठच्या झाडांवर मजली दुमजली घरटी बांधणारे हे गरुड वर्षानुवर्षे आपले संसार इथे मांडून आहेत. तर हिवाळ्याच्या चाहुलीने दर वर्षी वेगवेगळे सिगल पक्षी सुद्धा किनारी दाखल होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसते. विकासाच्या अती क्रमणापासून दूर राहिलेले आणि मानवी हस्तक्षेप टाळून राहिलेले समुद्र किनारे अनेक पक्ष्यांची वस्ती स्थाने आहेत.
सप्तरंगी इंद्रधनुचे रंग ल्यालेला तीबोटी खंड्या तर अलीकडच्या काळात कोकणचा पक्षी म्हणून ओळख मिळवून वन्यजीव प्रेमी मध्ये प्रसिद्ध झाला आहे. पावसाळ्यात घरटी बांधण्यासाठी सर्वत्र पसरणारा हा रंगांची उधळण करणारा खंड्या विलक्षणीय आहे. तर खाडी किनारी आढळणारे ब्लॅक capped आणि stork billed हे सुद्धा ठराविक भागात अस्तित्व टिकवून आहेत.
पाणथळ जागी वेगवेगळी बदके सुद्धा दिवसेंदिवस वाढतच आहेत. पाणकोंबडी, कमळ पक्षी, वारकरी, चक्रवाक, चक्रांग, चापट्या शेंडीवाले बदक सुद्धा दिसून आली आहेत. केरळ आणि दक्षिणेकडून पावसाळ्यात घरटी बांधण्यासाठी येणारा नवरंग ही तेवढाच प्रसिद्ध आहे.
सह्याद्रीची जंगले मात्र जैव विविधतेचे हॉटस्पॉट ठरली आहेत. रान कोंबडे, निलगिरी वूड पिजन, स्वर्गीय नर्तक, व्हर्डीटर सारखे माशिमार, हरोळी, कस्तुर असे अनेक विध पक्षी जंगलाचे वैभव आहेत.
वाहतुकीची साधने वाढली तसे नागरीकरण सुद्धा वाढत गेले अश्या शहरी भागात सुद्धा चिमणी, कावळे, सुगरण, कबुतरे, पोपट असे पक्षिजीवन विपुल आहे. परंतु स्वच्छतेचे निकष बदलले तसे कचरा सुद्धा वाढला आणि डंपिंग ग्राउंड च्या ठिकाणी घारी आणि scavenger दिसून येतात. एके काळी जिल्ह्यात गिधाडांची पण चांगली संख्या होती परंतु स्वच्छतेचे बदललेले निकष, मेलेल्या गुरांचे अवशेष दफन करणे अश्या पद्धतीनी गिधाडांची संख्या घटली आहे.
एकंदरीत पक्षिजीवनाचा आढावा घेतला असता मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड, शेती पद्धतीमध्ये होणारे बदल आणि यामुळे होणारा habitat loss सर्वच जीवनावर परिणाम करणारे ठरत आहेत. घरटी बांधण्यासाठी मोठं मोठ्या वृक्षांची कमतरता अनेक प्रजातींची संख्या घटण्यास कारणीभूत ठरू शकतात. हवामानात होणारे बदल, वादळाची वाढणारी संख्या, आणि पावसाचे बदलेलेले पर्जन्यमान अनेक वेळा स्थलांतरावर परिणाम करतात. अती पावसाने अनेक वेळा घरटी आणि झाडे तुटण्याच्या घटना ही गेल्या काही वर्षात घडल्या आहेत.
गेल्या काही वर्षात कोकणात अवैध शिकारीचे प्रमाण वाढत आहे. रान कोंबडे, तीतर, लावे, बदके अगदी मोर सुद्धा या शिकारीचे बळी ठरत आहेत. जरी सर्वत्र आढळ असला तरी अभ्यासांती यांच्या संख्येवर होणारा परिणाम अभ्यासणे गरजेचे आहे. याच शिकारी साठी लावले जाणारे वणवे सुद्धा तितकेच घातक असून आपल्या हजारो जिव्हानी अनेक पक्ष्यांची आश्रयस्थाने आणि घरटी हे वणवे नष्ट करतात. आणि पक्ष्यांचे खाद्य असणारे कीटक सरीसृप मोठ्या प्रमाणात नष्ट करतात. त्यामुळं वणवे रोखणं सुद्धा महत्त्वाचे आहे.
शेतीची बदलती तंत्रे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा पक्ष्यांना घातक ठरत आहे. कीटकनाशके आणि रसायनाचा वापर विषारी ठरतोच पण पर्यावरणीय समतोल ढासळण्यास सुद्धा कारणीभूत ठरतो. बदललेली पीक पद्धती अनेक वेळा अजाणतेपणी पक्ष्यांची संख्या घटवू शकते. फळबागांचे वाढते प्रमाण आंबा काजू लागवड ही वनक्षेत्र आणि जंगली फळे देणारी झाडे कमी करण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे यांचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून परसबाग लागवडीस प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
गेल्या काही वर्षात जिल्ह्यात पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर ची संख्या मात्र वाढते आहे. सोशल मीडिया वर फोटो आणि नवनवीन पक्ष्यांचा नोंदी सहजतेने मिळत आहेत. याच बरोबर सिटिझन सायन्स सारखे उपक्रम वन्य प्रेमींनी हाती घेऊन शास्त्रीय अभ्यासाला हातभार लावणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. Ebird inaturalists सारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध असून त्याचा वापर वाढणे आवश्यक आहे. तसेच शासन स्तरावर सुद्धा wetland आणि इतर अधिवास जतन कार्यक्रमात नागरिकांचा सहभाग करून घेणे गरजेचे आहे. तसेच महावृक्ष दत्तक घेणे, जंगल दत्तक घेणे असे कार्यक्रम राबवणे सुद्धा सहज शक्य आहे.
एकंदरीत शहरीकरणामुळे चिमणी सारख्या सर्व व्यापी पक्ष्याची संख्या इथेसुद्धा घटलेली दिसते, एके काळी सगळ्यांच्या अंगणात असणारा हा पक्षी आता खूप कमी ठिकाणी दिसून येतो. खाद्याची उपलब्धतेच्या प्रमाणात शहरी आणि ग्रामीण भागात पक्ष्यांच्या प्रजाती विभागलेल्या दिसून येतात. एकंदरीतच विपुलतेने आढळणारे रत्नागिरीतील पक्षीजीवन जे भूतकाळात फोफावले ते येत्या काळात अजुन बहरावे अशी इच्छा या पक्षी सप्ताहानिमित्त व्यक्त होत आहे.
फोटो क्रेडिट....
Shardul Kelkar Nitin Narvekar
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-1160744150653118"crossorigin="anonymous"></script>
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा