सीतेची आसवं
अमर्याद क्षितिजाच्या रथातून पलायन करणाऱ्या रावणाच्या रथाचा वेग वायुगतीशी स्पर्धा करत होता. आपणास फसवले गेले असल्याची जाणीव होत लक्ष्मण रेषा ओलांडणारी जान्हवी आता शोकाकुल झाली होती. तिच्या रुदनाने निसर्ग कष्टी झाला होता. तिची आकाशमार्गे जाताना पडणारी आसव अलगद टिपून घेत होता. आपल्या गर्द जांभळ्या पाकळ्या उलगडून प्रत्येक आसव फुलापानानी साठवून घेतले, आणि सीतेच्या मनातील आर्त भाव जाणवून जांभळ्या पाकळ्या पांढऱ्या फटक पडल्या. दरवर्षी पावसाचे पडणारे थेंब काळ्याकभिन्न कातळाच्या हृदयाला भेगा पाडतात, आणि भेगे भेगेतून सीतेची आसवे या प्रसंगाची आठवण होऊन प्रकटतात.
ही कथा आहे सीतेच्या आसवांची. कास चे पठार, कोकणातील सडे आणि कातळ जमिनी इथे आढळणारी ही वनस्पती युट्रीक्यूलेरीया (utricularia किंवा bladderwort) निळी पापणी, जठरी, कावळ्याचे डोळे, कावळ्याच फुल, अशी अनेक जाती आणि नावांनी ओळखली जाते. संथ वाऱ्याच्या झुळकेने डोलणारी जांभळ्या निळ्या रंगाची फुलं जणू सड्यांना निळा शालू पांघरला आहे की काय अशी जाणीव करून देतात.
सुंदर एक पाकळी असलेल्या निळ्या जांभळ्या फुलांनी वा-याबरोबर डुलत रहावं.पावसाबरोबर झिम्मा खेळावा आणि चार आठ दिवसांनी मातीमोल व्हावं हा त्यांचा आयुष्यक्रम.परंतु प्रत्यक्षात मात्र ही युट्रीक्यूलेरीया या जातीतील हीं सूक्ष्म जिवाहारी वनस्पती आहे. हीचे वर्तन शिकारी असून या वनस्पती अतिसूक्ष्म जीव जसे की आदिजीव (protozoa) तसेच इतर सूक्ष्म जलचर यांना फसवतात आणि पचवतात. हे सर्व कातळखाली होत असतं. जांभा दगडांवर माती कमी असल्याने पोषणमूल्य आणि नत्र तसेच क्षारांची कमतरता भरून काढण्यासाठी चे हे उत्परिवर्तन दिसून येते.
या वनस्पती मध्ये निळी पापणी (रेटीक्युलाटा), पानपापणी (स्टेल्यारीस), चिरे पापणी (स्ट्रायट्युला) ही विविध जातींची फुले सह्याद्रीमध्ये सापडतात .अंदाजे ७-१० सेंटिमीटर उंच वाढणा-या या रोपाच्या नाजूक फुलांखाली खोड आणि मुळांवर सूक्ष्म भोक आणि दाट केस असणारी जठरं असतात.ही अति सूक्ष्म जीवाना फसवून अडकवतात आणि सावकाश पचवतात. सुंदर आणि नाजूक फुलं ही या वनस्पतीचा सर्वात सुंदर आणि आकर्षक भाग. काही फुलं जांभळी काही निळी तर काही पांढरी असतात. रंगद्रव्य जितक्या प्रमाणात यानुसार हे रंग दिसतात. पांढऱ्या फुलांमध्ये रंग द्रव्य पूर्णतः नसतात. तशी ही चिखलात वाढणारी आणि जमिनीलगत पसरणारी वनस्पती असल्याने पानं खोड मूळ अशी विभागणी दिसून येत नाही. आणि बराचसा भाग पाण्यात बुडून राहत असल्यामुळे पाण्याखालच्या जीवनाला ही वनस्पती अनुकूल झालेली आढळते. झाडाची खोड नाजूक असून stolon नी बनलेली असतात आणि त्यावर दोरी सारखे थोडे आणि जाळ्यांसारखे थोडे भाग असतात. ही जाळी वापरून पाण्यामधले सूक्ष्म जलचर वनस्पती पकडते आणि उरलेले हिरवे भाग फोटो सिंथिसिसने अन्न बनवण्याच काम करत असतात. तसेच stolon वर असणारे जठरा सारखे सापळे ही शिकारी मध्ये मदत करतात.असं सर्व असून ही यांच्या उमलणाच्या काळात दिसणार दृश्य आणि सड्याचे होणार विहंगम परिवर्तन या वनस्पतींना महत्व देऊन जातात. अनेक ठिकाणी तर पर्यटन उद्योग या वनस्पतीच्या उमलण्यावर अवलंबून आहे. कोकणात गौरीच्या सजावटी मध्ये काही ठिकाणी ही फुलं वापरली जातात. रत्नागिरी मधलं चंपक मैदान असेल किंवा आदिष्टी च पठार, या फुलांची निळाई या पठरांच साैंदर्य कैक पटीने वाढवते. परंतु काही वर्षात सड्यावर केली जाणारी आंबा लागवड, बांधकाम, खाणकाम आणि इतर विनाशकारी प्रकल्प यामुळे ही वनस्पती धोक्यात आली आहे. अवघ्या पावसाळ्यापुरता जीवनक्रम असणारी ही वनस्पती सुद्धा भूमिकन्या सीतेप्रमाणे भुमाते च्या उदरात गडप होते ती पुन्हा पुढच्या वर्षी जन्म घेण्यासाठी. जन्म मृत्यूचे हे अगणित सोहळे पहात आपला कातळ सडा मात्र अहिल्येच्या शीळे प्रमाणे उद्धाराच्या आशेने पडून राहतो जन्मभर…..
खूप चांगली माहिती. आजच आदिष्टीला या फुलांचं छान दशन झालं .
उत्तर द्याहटवा