रस्ते विकास आणि वन्य जीव संरक्षण...
रस्ते हे विकासपर्व सर्वत्र पोहोचवण्याचे माध्यम आहे.उत्तम रस्त्यांचे जाळे कोकणासारख्या पर्यटन विकासपासून वंचित राहिलेल्या भागात रोजगार आणि सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात अशी संकल्पना सर्वमान्य आहे म्हणूनच गेल्या काही वर्षात मुंबईगोवा महामार्ग, रावस ते रेड्डी सागरी महामार्ग, मिऱ्या सोलापूर महामार्ग असे अनेक रस्ते चौपरीकरणाच्या प्रक्रियेत आहेत अथवा मार्गावर आहेत. कोकणची भौगोलिक परिस्थिती डोंगर दर्यांचे प्रदेश त्यामुळे निर्माण होणारी घाटांची वळणे कमी करून वाहनांचा वेग वाढवावा ही रस्त्यांमागची मुख्य कल्पना. हे साध्य करत असताना अनेक ठिकाणी अभ्यास न करता फोडलेले डोंगर, पाण्याच्या प्रवाहाचे बदललेले मार्ग, कोसळणाऱ्या दरडी अश्या अनेक घटना ताज्या आहेत. याच बरोबर दुतर्फा असलेले पांथस्थ महावृक्ष् सुद्धा कुऱ्हाडीने तोडले गेले आहेत अथवा प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे रस्ते विकास आणि प्राणी पक्षी जीवन हे बरोबरीत चालू शकते का? रस्ते करत असताना अश्या उपाय योजना करता येणे शक्य आहे का? मार्गावर रोज मरुन पडणारे अगणित साप, सरडे, खारी वाचवणे शक्य आहे का? अश्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विचार विनिमय करणे अत्यंत आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात १० ते १२ बिबटे, रान कुत्रे, उदमांजर, वाघाटी, कोल्हे असे अनेक प्राणी जखमी आणि मृत झाल्याच्या घटना दोन्ही जिल्ह्यात घडत असल्याचे आढळून आले आहे. आंबोली सारख्या रेन फॉरेस्ट भागात तर अनेक दुर्मिळ प्रजातीचे साप वेगवान वाहनाखाली येऊन चिरडले आहेत. अश्या घटना सातत्याने घडत असल्याने यावर ठोस उपाय योजना कराव्या अशी मागणी आता जोर धरत आहे.
आशिया खंडाचा विचार केला तर २००५-१० दरम्यान झालेल्या एका अभ्यासानुसार रस्ते विकासाचे प्रमाण हे १६ पासून ५१ टक्के एवढे झाले आणि याचा परिणाम म्हणून रेन फॉरेस्ट ही मोठ्या प्रमाणावर खंडित झाली आणि घटली. कोणत्याही मोठ्या रस्त्याच्या आजूबाजूच्या १० किमी मध्ये जैव विविधता मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याचे आधलून आले आहे म्हणूनच रस्ते हे अवैध शिकार, लाकूड तोड आणि जंगले नष्ट होण्याचे महत्वाचे कारण असल्याचे जागतिक पातळीवर मान्य करण्यात आले आहे. किंबहुना या विषयावर शास्त्रज्ञांनी “poorly planned roads are characterized as the “enemy” of rainforest biodiversity”.(Laurance et al. 2009). हे मत नोंदवले आहे. म्हणजेच व्यवस्थित उपाययोजना आणि प्लॅन नसणारे रस्ते हे सरळ सरळ जैव विविधतेचे शत्रू असल्याचे स्पष्ट होते. विकसनशील देशांत आर्थिक स्त्रोतांची कमतरता, अयोग्य नियोजन, इच्छा शक्तीचा अभाव यामुळे उपलब्ध असणारे अनेक उपाय एकतर टाळले जातात किंवा दुर्लक्षित केले जातात. याचा परिणाम शेवटी वन्य जीव मृत होण्यात आणि अपघातांची संख्या वाढण्यात होतो.
वाहनांची धडक टाळण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत याची चर्चा आपण खालील भागात करूया. सर्वात कमी खर्चिक उपाय म्हणजे माहितीपर बोर्ड लावणे. जास्त वन्य जीव क्रॉसिंग च्या जागा ओळखून तिथे वाहनांनी गती कमी ठेवावी म्हणून उद्बोधन कारक बोर्ड लावणे हा एक प्राथमिक उपाय परंतु कमी खर्चिक असल्याने सर्वत्र राबवला जातो. विशेषता अभयारण्यातून जाणारे मार्ग, हत्तींचे ये जा करण्याचे मार्ग अश्या ठिकाणी हे बोर्ड दिसून येतात. वाहनांची गती कमी असणे हे ही अश्या धडका ५८ टक्के नी कमी करण्यात यशस्वी झाले असल्याचे एक अभ्यास सांगतो. त्यामुळे वाहन चालकांना जाणीव करून देणे आणि लोक शिक्षण यात हे बोर्ड नक्की उपयोगी ठरतात. त्याचरोबरीने अनेक ठिकाणी रस्ते तयार करताना वळणे, रंबल स्ट्रिप, ट्रॅफिक सर्कल, स्पीड बंप असे अनेक मार्ग वापरून वेग मर्यादा कमी राखता येते.
वन्य जीव संरक्षण करण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे रस्ते ओलांडण्यासाठी संरचना उभारणे. अश्या संरचना आणि कुंपण एकत्रित रित्या जवळ जवळ ९८ पर्यंत धडकींचे प्रमाण घटवतात आणि प्राणी आणि माणूस दोघांची ही जीवित हानी टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. अश्या संरचना या दोन प्रकारच्या आहेत एक म्हणजे अंडरपास आणि दुसरी ओवरपास. अंडर पास मध्ये रस्त्याखालून आणि पुलांची निर्मिती केली जाते. यात आर्चेस, गटारे, मोठे पाइप वापरून प्राण्यांचा भ्रमण मार्ग शाबीत ठेवला जातो. तर ओवर पास हे थोडे खार्चिक प्रकारच्या संरचना आहेत. यामध्ये ठराविक अंतरावर
विशिष्ठ पद्धतीचे पुल बांधले जातात आणि प्राण्यांना ये जा करणे सोप्पे केले जाते. या दोहींचीही डिझाईन आणि स्ट्रक्चर यात वेळोवेळी बदल होत आहेत आणि कालपरत्वे अनेक सुधारणा सुद्धा दिसून येत आहेत. या ब्रीज दोन्ही बाजूने कुंपणाची जोड दिली जाते. साधारणपणे दोन ते तीन मीटर उंचीचे कुंपण घालून वन्य जीवांचे भ्रमण ठराविक मार्गाने वळवता येते. यासाठी धातूंची जाळीदार तारांचे कुंपण वापरले जाते. तसेच हत्ती आणि अती पावसाच्या भागात जिथे सातत्याने मेंटेनन्स करावा लागेल अश्या ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारी विद्युत भारीत कुंपणे सुद्धा वापरली जातात. याचबरोबर रात्रीच्या वेळी ट्रॅफिक कमी करणे, अभयारण्य भागात रात्रीच्या वाहतुकीस पूर्ण बंदी घालणं हे उपयुक्त ठरतात.
हे सर्व करत असतानाच वन्य जीव भ्रमण मार्गांचे अभ्यास करणे हे तितकेच महत्त्वाचे ठरते. यासाठी ट्रॅप कॅमेरे लावणे या संयुक्तिक उपाय ठरतो. यातून जास्त भ्रमण होत असल्याचे भाग ओळखून तिथे जास्त उपाय करणे शक्य आहे. तसेच खेकडे आणि इतर जीवांचे सिझनल भ्रमण होत असताना काही उपाय करणे ही तितकेच गरजेचे आहे. विषेता नदी काठच्या रस्त्यांच्या बाजूला अश्या घटना दिसून येतात. पावसाळ्यात उबेला येणारे साप ही सुद्धा अश्याच प्रकारची समस्या आहे. याचबरोबरीने मेलेले रोड किल ना खाण्यासाठी येणारे इतर प्राणी सुद्धा गाडीखाली आल्याचे अनेकदा घडले आहे म्हणून असे मृत प्राणी रस्त्यावरून उचलून बाजूला ठेवणे आवश्यक आहे. रस्त्याच्या कडेला होणारी वड पिंपळ यांची लागवड अनेकदा अनेक प्राणी पक्षी यांना आकर्षित करत असते. यात खारी उदमांजर यांचा समावेश आहे. त्यामुळे अशी फळे देणारी झाडे जर टाळता आली तरी असे प्राणी रस्त्यांवर आकर्षित होणार नाहीत. रस्त्याच्या मध्यभागी अनेकदा अनेक फुलझाडे लावली जातात. यात कण्हेर, येलो अल्डार,बोगन वेल, शंकासुर अशी फुलझाडे समाविष्ट आहेत. या फुलांवर अनेक फुलपाखरे आकर्षित होतात आणि वेगाने येणाऱ्या वाहनाखाली येतात. त्यामुळे अशी झाडे लावताना ही सारासार विचार करणे गरजेचे आहे.
थोडक्यात अश्या पद्धतीचे अनेक मार्ग असताना आणि जागतिक स्तरावर अनेक नवनवीन मार्ग अवलंबले जात असताना आपल्याकडे अनेक वेळा प्राणी वाचवण्याची मानसिकता सुद्धा दिसत नाही. एखादे झाड वाचावे म्हणून अगदी केंद्रीय मंत्र्यांना साकडे घालण्याची वेळ अनेकदा येते. चौपदरीकरणाच्या वेळी जर दर वेळेला झाडे तोडावी लागणारच असतील तर मग मोठं मोठे वृक्ष लावणं तरी किती संयुक्तिक आहे. अन्यथा वृक्ष वाचवून रस्ते रुंद व्हावेत असे तंत्रज्ञान विकसित व्हावे याकडे ही लक्ष्य देणे गरजेचे आहे. नाहीतर फक्त महसूल देणारी लाकडे म्हणून या वृक्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन असल्याचे दुर्दैवाने दिसून येते. नवनवीन तंत्रज्ञान आणि डिझाईन्स रस्ते विकासात आणणे ही काळाची गरज आहे. नाहीतर प्लास्टिक ची झाडे, उघडे बोडके डोंगर यांनी सजलेले महामार्ग कोकणची हिरवाई पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्याऐवजी अचंब्यात टाकतील हे नक्की...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा