कोकणातले रहस्यमय कोळसुंदे
कोकणातले रहस्यमय कोळसुंदे
दैनिक तरुण भारत मुंबई वसुंधरा पुरवणी दिनांक १३ जुलै २०२०
कोकणातले रहस्यमय कोळसुंदे
गेली काही वर्ष आम्ही लावत असलेल्या ट्रॅप कॅमेरा मध्ये वेळोवेळी अनेक प्राणी मिळाले आहेत. शार्दुल केळकर आणि आमची सह्याद्री निसर्ग मित्रची टीम खवलेमांजर संरक्षण प्रोजेक्टसाठी फिरत असताना आणि गावोगावी भेट देत असताना अनेकदा लोकांकडून कोळशिंदे प्राण्यांचे किस्से ऐकायला मिळायचे. सह्याद्री पर्वतरांगे जवळची गावं सुरुवातीला ह्या कहाण्यांची केंद्रस्थाने होती, परंतु नंतर अगदी देवरूख संगमेश्वर रस्त्यावरची गावं, खाडीपट्ट्या मधली गावं इथे सुद्धा या गोष्टी कानावर पडू लागल्या. शार्दुल रात्री प्रवास करून येत असताना एकदा साखरपा-लांजा रस्त्यावर गाडीखाली येऊन मेलेला एक रानकुत्र्याचे मृत शरीर सुद्धा सापडले. यांनतर आम्ही ज्या गावांमध्ये वेळोवेळी अश्या कळप दिसल्याच्या घटना घडतात तिथे जाऊन चौकशी केली आणि अश्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे सेट केले. त्यात आम्हाला काही कळप मिळाले. हे कळप ६ ते ७ कुत्र्यांचे होते आणि त्यात पिल्ले पण होती. एका गावामध्ये तर जवळजवळ वर्षभर कॅमेरा लावायचा निर्णय आमच्या टीम ने घेतला आणि तो योग्य ही ठरला, कारण शेळी मेंढी पालन मोठ्या प्रमाणात होत असलेल्या या गावात आम्हाला जवळ जवळ वर्षभर यांचे अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत.इथल्या गावकऱ्यांशी बोललो असता त्यांचे सह्याद्री पर्वत रांगांमध्ये सुरुवातीला वास्तव्य होत परंतु व्याघ्र प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्यांचे वस्तीच्या ठिकाणी पुनर्वसन झालं आणि त्यांच्या शेळ्या-मेंढ्या पाठोपाठ रानकुत्रे पण वस्तीकडे दाखल झाले असावे असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावर अधिक अभ्यास होण गरजेचं असल्यामुळे सध्या याकडे एक स्थलांतर थेइरी म्हणून पाहायला हरकत नाही.
दर वर्षी उन्ह्याळ्याच्या दिवसात मात्र कोसूंब,कोळंबे,डिंगणी,राई भातगाव अश्या गावांमध्ये दरवर्षी रान कुत्र्यांचे कळप काही दिवसांसाठी नेहमी आढळून येतात. तसेच लांजा राजापूर तालुक्यात सुद्धा अनेक गावांमध्ये हे कळप फिरत आहेत असं प्रत्यक्षदर्शीच म्हणणं आहे. काही रेल्वे ट्रॅकमन यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार कदाचित हे कळप रेल्वे रुळांचा आणि पुलांचा भ्रमण मार्ग म्हणून उपयोग करत असावेत अशी शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी वन्यअभ्यासक अनिश परदेशी यांना फणसाड अभयारण्य मध्ये सुद्धा रानकुत्रे आणि त्यांचे कळप वावरत असल्याचे पुरावे आढळले आहेत. आरवली भागात मागच्याच आठवड्यात एक मेलेला रानकुत्रा दिसून आला होता. आणि कालच गुहागर मधली घटना पाहिली तर आता हे कळप समुद्र किनारी भागात पोचले असावे असा अंदाज आहे.
या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात अनेक गैर समज असल्याचं सुद्धा प्रकर्षाने चर्चेतून जाणवतं. उदाहरणार्थ हे रान कुत्रे आपले मुत्र भक्ष्याच्या डोळ्यात उडवून त्यांना आंधळे करतात, आपल्या शेपटीच्या गोंड्याने हे मुत्र उडवतात, आणि हा प्राणी अत्यंत क्रूर असतात वगैरे. परंतु या गोष्टींमध्ये तथ्य दिसून येत नाही. काही वेळेला जिवंत शिकारीचे लचके तोडल्याचे व्हिडिओ सुद्धा इंटरनेट वर उपलब्ध असले तरी यांनी माणसावर केलेल्या हल्ल्यांची उदाहरणे जवळ जवळ शून्य आहेत. त्यामुळे या प्राण्यापासून भिती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही.
या प्राण्यांविषयी अनेक आख्यायिका तसेच गोष्टी सुद्धा प्रसिद्ध आहेत आणि त्यातील बऱ्याच गोष्टी मध्ये तथ्य सुद्धा आढलून येते जसे की हा प्राणी मुख्यतः कळपात (झुंडीने) राहून शिकार करतो आणि ह्याच्या आकारमानाच्या जवळपास ३-४ पटीने मोठ्या असलेल्या भक्ष्याला हा मारू शकतो. हा वाघ, बिबट्या ह्यांच्यापेक्षा ही शिकार पकडण्यामध्ये जास्त वेळा यशस्वी होतो. याचा दरारा असा की जंगलामध्ये जर वाघ ह्याच्या समोर आला तर वाघसुद्धा स्वतःचा रस्ता बदलून दुसऱ्या रस्त्याने जाणं पसंत करतो पण ह्याच्या नादाला लागत नाही.
आकारमानाने आपल्या कुत्र्याएवढा असणारा हा प्राणी शरीरावरील तांबूस रंग आणि काळ्या रंगाची झुपकेदार शेपटी ह्या ठळक वैशिष्ट्यांमुळे लगेच ओळखून येतो. साधारणतः १५-१८ किलोग्रॅमपर्यंत ढोलचे वजन भरते. जंगली कुत्रा हा ५-१२ सदस्यांना घेवून कळपाने राहणे पसंत करतो. ह्यामध्ये नरांची संख्या मादीच्या मानाने जास्त असते. ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणारा विणीचा हंगाम जानेवारीपर्यंत संपतो. ढोलची मादी ६०-६३ दिवसांनी सरासरी ५-६ पिल्लं जन्माला घालते. ढोलचा अधिवास जंगल जरी असलं तरी त्यांना या जंगलात एक विशिष्ट जागा हवी असते. विशिष्ट रचनात्मक पद्धतीने ढोल जमिनीमध्ये खड्डा करून भुयार बनवतात. ढोल हा सामाजिक प्राणी आहे शिकार करण्यापासून ते जन्माला आलेल्या पिल्लांची काळजी घेण्यापर्यंत सर्व काही ते कळपाने करतात.
आकाराने कुत्र्याएवढा असणारा हा प्राणी शिकार मात्र त्याच्यापेक्षा २-३ पट मोठया असलेल्या प्राण्यांची करतो. सांबर, डुक्कर, चितळ, भेकर (barking deer), पिसोरी (mouse deer) अशा प्राण्यांना शिकारीच्या वेगवेगळ्या पद्धती वापरुन मारतो.
शिकारी साखळी मध्ये अगदी उच्चस्थानी असणारे हे ढोल तृणभक्षि प्राण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचं महत्त्वपूर्ण काम करत असल्यामुळे त्यांचं संवर्धन आणि संरक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे. भारतीय वन्य जीव संरक्षण कायद्या प्रमाणे ही या प्राण्यांना संरक्षण प्राप्त आहे.IUCN ह्या जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थेने वाघाला ज्या endangered category मध्ये ठेवले आहे, त्याच category मध्ये ढोल आहे. आपल्या कोकणातदेखील आधीपेक्षा ढोलची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे जर वेळीच आपण ढोल प्राण्याची दखल घेतली नाही, तर येणाऱ्या काही वर्षांत चित्याप्रमाणे आपल्या भारतातून ढोल कधी नामशेष होईल हे कळणार सुद्धा नाही.
प्रतिक मोरे
माहितीपूर्ण!
उत्तर द्याहटवाछान माहिती मिळाली
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाNice info
हटवा