चंपक मैदान जैवविविधता


   १९९२ सालातली गोष्ट आहे.रत्नागिरी शहराच्या किनारी भागातली २०० हेक्टर जमीन एमआयडीसी ने स्टरलाईट ला कॉपर स्मेल्टींग प्लॅन्ट उभारण्यासाठी दिली.७०० कोटी चा हा प्रकल्प वर्षात ६०००० टन तांबे तयार करणार होता. माडाच्या बनात समुद्राच्या सानिध्यात रमणाऱ्या कोकणी माणसाना हा प्रकल्प फारसा काही रुचला नाही. आंबा काजू आणि मासेमारी वर अवलंबून असणाऱ्या व्यापाऱ्यांनी याला विरोध करायला सुरुवात केली. आणि प्रस्तावित मिऱ्या बंदरामुळे किनाऱ्याची धूप होणार हे लक्ष्यात आल्यावर सगळे रत्नागिरीकर आंदोलनात सहभागी होऊ लागले. यावेळी मोठी अडचण अशी होती की या प्रकल्पाने खरंच नुकसान होईल की नाही याची वैज्ञानिक माहिती आंदोलनकर्त्यांकडे उपलब्ध नव्हती. आंबा काजू वर तापमानाचा परिणाम होणार आणि उत्पादन कमी होणार अशी अटकळ होती. प्रस्तावित मिरया बंदरामुळे ब्रेक वॉल बांधावी लागणार आणि पाण्याचा करंट बदलून मासेमारी प्रभावित होणार अस जुन्या जाणत्या माणसांचं म्हणणं होत. स्थानिक ग्राम पंचायतीने कंपनीला काम करण्याची परवानगी नाकारली आणि संघर्षाची ठिणगी पडली. मग कोर्ट कचेऱ्या चालू झाल्या मध्यतरीच्या काळात पर्यावरणीय अहवाल ही करून घेण्यात आला. यात किनारपट्टी ची होणारी धूप आणि प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण आणि त्याचा इथल्या बागायतीवर होणारा दुष्परिणाम अधोरेखित करण्यात आला होता. एके दिवशी अशाच जमलेल्या जमावाने कंपनीचं काम बंद पाडलं आणि त्याचा परिणाम म्हणून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्प स्थगित करत असल्याचे घोषित केले आणि कंपनीने इथून आपला गाशा गुंडाळला. अशा पद्धतीने प्रदूषणकारी प्रकल्प कोकणातून हद्दपार करण्यात लोकांना यश आले होते. 

          यानंतर ही जागा पडूनच होती. या जागेची भौगोलिक रचना पहिली तर डोळ्यासमोर येते ती कातळाचे सपाट मैदान. अधे मध्ये असलेली पाणथळ तळी आणि विस्तीर्ण गवताळ कुरणे. एका बाजूला नगर परिषदेने कचरा डंपिंग ग्राउंड म्हणून वापर करत राहिली. बाकी सगळ्या जागा झुडपी जंगलाने आणि गवताने वेढल्या. दरवर्षीच्या पावसामध्ये इथे कातळ फुलं मोठ्या प्रमाणावर उगवू लागली आणि तळ्यांमध्ये स्थलांतरित पक्षांनी येणं सुरु केले. अशाप्रकारे एक परिपूर्ण प्रकारची इकोसिस्टीम काही वर्षात इथे तयार झाली.

      आत्ता या सगळ्याची आठवण होण्याचे कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यामध्ये त्यांनी या जागेवर मरीन पार्क किंवा मॅंगो पार्क उभा करण्याची केलेली घोषणा. कोकणामध्ये सध्या रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकल्प आणले जात आहेत. मग नानारची रिफायनरी असेल किंवा जिंदालच्या औष्णिक विद्युत प्रकल्प असेल. या प्रकल्पांना स्थानिक जनतेकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. इथल्या लोकांचा विकासाला विरोध नसून ज्या पद्धतीने हे विनाशकारी प्रकल्प लादले जात आहेत त्याला आहे. खरंतर इथले समुद्रकिनारे बाकीची पर्यटन स्थळ यांचा विकास करून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. त्याऐवजी या प्रकल्पांना प्राधान्य दिले जात आहे.

     गेली काही वर्ष रत्नागिरीतील लेन्स आर्ट हा ग्रुप चंपक मैदान आणि सभोवतालचा परिसर इथे जैव विविधतेचे चित्रण करत आहे. त्यांनी केलेल्या चित्रणातून इथली जैव विविधता आज सर्वांसमोर आली आहे.

   रत्नागिरी मधला कोल्हापूर हायवे जिथून सुरू होतो तिथे आपण पोचलो की समोर येतो तो हा चंपक मैदानाचा परिसर. साध्या नजरेला ही कातळ जमीन उजाड आणि वैराण वाटते. सुकलेले गवत आटलेल पाणी आणि भाजणाऱ्या उन्हाच्या झळा याचं रूपांतर वाळवंटात करतात. अशाच तप्त वातावरणात वर्षा ऋतूची चाहूल लागते आणि पहिल्या सरी या कातळावर बरसतात. इथूनच सुरुवात होते एका रुपांतरणाला. सीतेची आसव, आषाढ हबेआमरी, दिपकाडी या वनस्पती प्रकट होतात. जांभळा पांढरा गुलाबी रंगाची उधळण करत कातळ पठार अचानक रंगीबेरंगी गालीच्या मध्ये रुपांतरीत होत. तुतारी सोनकी कुर्डू भारंगी तेरडा अश्या एकाहून एक वनस्पती आणि त्यांची रंगी बेरंगी फुलं पाहण्यात मन हरकून जातं. कास च्या पठराशी स्पर्धा करेल एवढ्या जाती इथ आढळतात यात शंका च नाही. मग स्थलांतरित पक्षी जसे की लेसर व्हिस्टलींग टील आणि पिंटेल यासारखी बदकं, चातक पावश्या सारखे ककु इथ दिसू लागतात. घारी गाय बगळे करकोचे टीटव्या ल्हावे वेडा राघू इथले कायमचे रहिवासी.कोतवाल मैना पोपट मोर खाटीक सहज दिसतात. श्रावणमासी तर इथली हिरवळ आणि रंगी बेरंगी फुलं यांचं कॉम्बिनेशन अचंबित करणारं असतं. गवत वाढायला लागलं की मग हॅरियर ईगल आणि ससाणे इथे घिरट्या घालू लागतात. गेल्या काही वर्षात रेड नेकड फाल्कन,शाहीन फाल्कन पेरिग्रिन फाल्कन अमुर फाल्कन इथे आढळून आलेत. स्नाईप पलोवर सारखे किनारी पक्षी पण आपली हजेरी लावतात. असे तब्बल ९० पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी ४० एक प्रकारची कातळ फुलं कोल्हे साळिंदर सारखे प्राणी फुलपाखरांच्या ३० एक प्रजाती इथे आढळल्याची नोंद आहे. असा हा जैव विविधतेने नटलेला परिसर लवकरच एखाद्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी वापरला जाणार आहे. खरं तर कोकणाला विकासाची गरज आहे हे ही खरं परंतु तो विकास हा चिरस्थायी असावा असं याप्रसंगी वाटत. ही सर्व जैव विविधता नष्ट न करता काही मार्ग काढता येईल का याची चाचपणी होण गरजेचं आहे. सद्य स्थिती त सरकारने इथल्या जैव विविधतेच मापन करावं आणि नंतर इथला प्लॅन ठरवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. कास चा धर्तीवर जर इको पर्यटन करणं शक्य असेल तर तो मार्ग ही अवलंबला जावा. एमआयडीसी ने यातील काही भाग जो इको सेन्सिटिव्ह आहे तो संरक्षित करावा आणि कोकणचा अनमोल ठेवा जपावा हीचं काय ती मागणी.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट