गूढ आणि वलयकारी ब्लॅक पँथर
गूढ आणि वलयकारी ब्लॅक पँथर
"जंगल जंगल बात चली हैं पता चला हैं…. " नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या मिलेनियल तरुणाच्या भाव विश्वात हे अजरामर गाणं. रविवारी लागणाऱ्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही वर मोगली लागलं की बाहेर खेळायला धावणारी पावलं टीव्ही समोर अडखळायची. यातली सगळी च पात्र शेर खान, मोहिनी, बल्लू, सगळे मोगली चे जंगली भाऊबंद आज पण डोळ्यासमोर येतात. परंतु सगळ्यात जास्त ज्याच लहानपणापासून आकर्षण आहे तो म्हणजे बघिरा. बिबट्याचे सगळे स्वभाव गुण जणू कोळून प्यायलेला, शांत, सय्यमी आणि भेदक नजर जी काळजात आरपार जाईल, अत्यंत चपळ आणि तितकाच लॉयल. साहित्यात अत्यंत अजरामर झालेलं हे पात्र ब्लॅक पँथर नावाने जगभरात प्रसिद्ध आहे. मध्य भारतात घडलेल्या या कहाणी सारख्या अनेक आख्ययिका, गोष्टी पूर्ण आणि या प्राण्यांविषयी असलेले वलय मात्र जगभर पसरले आहे.
ब्लॅक पँथर या नावाचा विचार केला तर ती एक संयुक्तिक टर्म म्हणता येईल. यात भारत आणि आफ्रिकेत मिळणारा काळा बिबट्या, साऊथ अमेरिकेतले काळे जग्वार यांचा समावेश होतो. यांचं लॅटिन भाषेतील कुळ pantheraअसल्यामुळे ही व्याख्या रूढ झाली असावी. परंतु प्रत्यक्षात मात्र ही वेगळी प्रजाती नसून काळया रंगाचे प्रमाण जास्त असणारा बिबट्या किंवा जग्वार हाच ब्लॅक पँथर नावाने ओळखला जातो. भारतात फक्त बिबट्याच आढळत असल्याने आपल्याकडे काळया रंगाचा बिबट्या म्हणजेच ब्लॅक पँथर होय.
शरिराचे रंग ठरवणारे मेलानीन हे रंगद्रव्य वाढल्यामुळे म्हणजेच शास्त्रीय भाषेत मेलानिसम (melanism) यांचे शरीर काळया ठीपक्याईवजी पूर्णतः काळे किंवा अधिक काळे दिसते. याउलट मेलानीन कमी झाल्यामुळे ल्युकिझम (Leucism) म्हणजेच पांढरा बिबट्या ही दिसू शकतो. जरी काळा रंग जास्त प्रमाणात असला तरी ठिपके बऱ्याच वेळेला दिसतात. ही एक जेनेटिक कंडीशन आहे कोणत्याही प्रकारचा रोग नाही हे ही इथे लक्ष्यात घेतलं पाहिजे.मेलानिझम हा एका रेसेसिव जिन मुळे होतो. एका मादीला काही पिल्ले मेलानिस्टिक तर काही नॉर्मल सुद्धा होऊ शकतात. बऱ्याच ठिकाणी असं दिसून आलेलं आहे की हे एका प्रकारच चांगलं उत्परीवर्तन आहे. दाट झाडी आणि जंगल असणाऱ्या प्रदेशात काळा रंग लपण्यासाठी फायदेशीर ठरत असल्यामुळे या भागात या रंगाचं प्रमाण जास्त दिसून आलेलं असल्याचा एक अभ्यास सांगतो. प्राथमिक अभ्यासात हे नैसर्गिक प्रतिकार क्षमतेचे फायदेशीर उत्परिवर्तन ( beneficial mutation) असल्याचे दिसून आले आहे. बिबट्याचे टीपिकल काळया रंगाचे ठिपके मेलानिझम मुळे लपले जाऊन जे काळया रंगाचे नवीन पॅटर्न तयार होतात त्यांना घोस्ट रोसेटी अशी म्हणतात. साधारणतः एकूण लोकसंख्येच्या ११ टक्के एवढं काळया बिबट्याचे प्रमाण हे त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत असू शकते.कॅमेरा ट्रॅप स्टडी मध्ये या बिबट्याचे प्रमाण हे सदाहरित आणि निमसदहरित वनांमध्ये जास्त प्रमाणात आढळले आहे.
कोकणात सुद्धा आता पर्यंत खूप वेळा काळया बिबट्याचा वावर दिसून आला आहे. काही वर्षांपूर्वी राजापूर आणि गुहागर अश्या दोन ठिकाणी ब्लॅक पँथर विहिरीत पडल्याचे आढळून आले आणि यांना वन विभागाने यशस्वी रित्या जंगलात पुन्हा सोडून सुद्धा दिले होते. राजापूर गोठीवरे च्या परिसरात आजही अश्या एका बिबट्याचा मुक्त वावर असल्याचे अनेक प्रत्यक्ष दर्शी नी पाहिले आहे. नुकताच संगमेश्वर तालुक्यातील आरवली आणि कोंडीवरे गावाच्या पंचक्रोशी मध्ये या च दर्शन वारंवार लोकांना होत आहे. या ठिकाणी वन विभागाने ट्रॅप कॅमेरे सुद्धा लावून याचे पुरावे गोळा करणे सुरू केले आहे.
रुडयार्ड किपलिंग च्या जंगल बुक, अश्याच नावाच्या मार्वल युनिव्हरस मधल्या एका हीरो चे नाव आणि बास्केट बॉल मधली सुप्रसिद्ध टीम कॅरोलिना पँथर्स चे मानचिन्ह असलेला हा ब्लॅक पँथर कवी कल्पनेतला नसून प्रत्यक्ष एक सुंदर आणि मनमोहक प्राणी आहे हेच सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच.. आणि हेच प्रसिद्ध फोटो ग्राफर शान जंग यांनी काबिनी मध्ये काढलेल्या आणि अत्यंत प्रसिद्ध झालेल्या विविध फोटो मधून आपल्याला दिसून येते.
©प्रतिक मोरे
सुंदर माहिती.
उत्तर द्याहटवा