श्रावण फुलांची स्वप्ननगरी कोकण सडे
श्रावण फुलांची स्वप्ननगरी कोकण सडे
भगवान परशुरामांनी बाण मारून समुद्र मागे हटवला आणि प्रकट झाली ती स्वर्गीय कोकणभूमी पश्चिमेला सह्याद्रीचे राकट कडे आणि पूर्वेला गाजणारा समुद्र अशा चिंचोळ्या पट्टीत नारळी-पोफळीच्या बागा भाताच्या हिरव्यागार शेतीत वसली आहे ही देवभूमी. लाखो वर्षांपूर्वी झालेल्या भूगर्भीय हालचाली आणि त्यातून झालेली भूपृष्ठाची रचना, कुठे ताशीव कडे, कुठे नद्यांनी पोखरलेली अरुंद खोरी, तर कुठे वाळूच्या पुळणी आणि सागर किनारे आणि यालाच समांतर अशी कातळाची सपाट मैदाने. या भूरूपांनी इथलं जीवन घडवलं, त्याला आकार दिला,जगण्याची प्रेरणा दिली. इथले जीवन हवामान पर्यायाने निसर्गावर इतक अवलंबून आहे की त्याच्या लहरीपणामुळे फटके कोकणाची लेकरं हसतमुखाने सहन करतात आणि नारळा सारख्या वरून कठीण कवचासारखी कोकणी माणसं आतून मात्र गोड मधाळ खोबर्या सारखी असतात. या भूमीतील भूरूपे सुद्धा अशीच वरून उजाड,पडीक,नापीक दिसणारी आणि आणि भूगर्भतून उगम पावणार्या शेकडो प्रकारच्या जीवांना आसरा देऊन अंगाखांद्यावर खेळवणारी. असेच एक भूरुप म्हणजे सडा. सडा म्हणजे जांभा दगडाच्या म्हणजेच लाटेराईट बसाल्ट या लाल रंगाच्या रूपांतरित दगडा पासून बनलेली विस्तीर्ण माळराने. यांना इथल्या बोलीभाषेमध्ये सडा असे म्हणतात. खरंतर सडा हा शब्द न ऐकलेला कोकणी माणूस विरळाच तरीही मानवी वस्तीने गुदमरली गावकुस ओलांडून जसजसं आपण बाहेर पडतो तसे कोकणातल्या बहुतेक अशा गावांमध्ये असे माळ पाहायला मिळतात.
काळाकभिन्न कातळ उन्हाच्या तप्त झळांनी तापत इथे पहुडलेला दिसतो. गवताच्या सुकत आलेल्या आणि वाऱ्याच्या झोताने इकडून तिकडे उडणाऱ्या काड्या, पिवळीशार कोच, करवंदीच्या जाळ्या इतकीच काय ती इथली परिस्थिती. मग अचानक समुद्रावरचे खारे वारे वेगाने वाहू लागतात, एखादा विजेचा लोळ पावसाचा संदेश घेऊन कातळावरती आदळतो आणि मान्सूनच्या आगमनाची चाहूल तृषार्त झालेल्या प्राणिमात्रांना देतो. टिटव्या ओरडू लागतात, पावश्याचे आर्त स्वर चहुबाजूने कानावर पडू लागतात, जलधारांचा वर्षाव धरतीवर होतो आणि आकाशातून कोसळणारे थेंब कातळाच्या छातीला जणु भेगा पडतात आणि या भेगातून हजारो प्रकारच्या वनस्पती प्रकट होतात. पावसाचं पाणी कातळात मुरत नाही ते डबकी छोटी तळी यामध्ये साचून राहतं तर कुठे कातळात असलेल्या भेगांमधून शेजारच्या गावातील विहिरींना जाऊन मिळतं. हिवाळ्यापासून जमिनीच्या आत दडून बसलेली बेडक आता सुरतालात गुंजारव करण्यासाठी कातळावर प्रकटतात तर कुठे छोट्याश्या नाल्याडबक्यात साचून राहिलेले मळ्याचे मासे अंडी देण्यासाठी लगबग करू लागतात. चतुर गोगलगायी खेकडे कोळंबी असे अनेकविध जीव आपले जीवन क्रम चालू करण्यात व्यस्त होतात आणि यांवर अवलंबून असलेले अनेक विविध पक्षी साप सरडे पाली कोल्हे साळींदर रानमांजर बिबटे सुद्धा हजेरी लावतात उन्हाळ्यात जिथे निर्जीवतेचं अधिराज्य होते त्या सड्यांवर आता श्रावणोत्सव सुरू झालेला असतो.
सड्यांवर पावसाळी महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वनस्पतीजीवन आढळून येतं. इथली भौगोलिक रचना पाहिली असता पावसाळ्याचे काही महिने सोडले तर इतर वेळेला इथे पाण्याची कमतरता असते. वनस्पतींना अत्यावश्यक असणारी पोषणमूल्ये आणि वाढण्यासाठी लागणारे मृदा ही पाण्यानेच वाहून येत असल्यामुळे येथे बारमाही वनस्पती आढळत नाहीत. वर्षाचे आठ महिने कोरडे राहूनही पावसाळ्यात ओलेकच्च होणाऱ्या सड्यांवर शुष्क आणि पाणथळ अशा दोन्ही ठिकाणी आढळणाऱ्या वनस्पती जोमाने वाढतात. येथील सतत बदलणारे हवामानाशी सुसंगत होण्यासाठी या वनस्पती अनुकुलित झाल्या असून विविध प्रकारची उत्परिवर्तने यांमध्ये आढळून येतात. या वनस्पतींचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यांचा एकाच वेळी आणि एकाच जागी मोठ्याप्रमाणात येणारा पावसाळी बहर. कातळातील भेगा छिद्रे खळगे यामध्ये अशा अनेक वनस्पतींना आश्रय मिळतो. इथल्या राकट जीवनाला सामोरे जाण्यासाठी वनस्पतींमध्ये झालेला पहिला बदल म्हणजे कंद निर्मिती. दीपकाडी, गडंबी कांदा, चिकर कांदा, चोहोळा, मुसळी, कंदील पुष्प, फोडशी अश्या अनेक कंदवर्गीय वनस्पती हे सड्यांचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
दीपकाडी किंवा एकदांडी ही वनस्पती तुरळक ठिकाणी आढळून येते. निशिगंधासारखच धवलशुभ्र फुल असणारी ही वनस्पती डोक्याच फुल, गुलछडी अशा नावांनी सुद्धा ओळखले जाते. एकादांडीवर उगवणार एकच फूल हे हीचे वैशिष्ट. गणपतीची सजावट, डोक्यात माळण्यासाठीचे गजरे अशा गोष्टींसाठी हिचा वापर होतो. तर क्रीनम लिली ,गडंबी कांदा या लीली सारख्या दिसणाऱ्या वनस्पती असून हार आणि गजरामध्ये यांची फुले वापरतात. चिकर कांदा, चोहोळा यांची रानटी पण आकर्षक फुले गुराखी स्त्रियांच्या डोक्यात माळलेली दिसून येतात.
इथल्या पोषणमूल्यांची कमतरता भरून पडण्यासाठी काही वनस्पतींनी मात्र भन्नाट मार्ग शोधून काढला आहे. सीतेची आसवे,निळी पापणी, खुर पापणी यांची निळेशार, जांभळट रंगाची फुले जितकी आकर्षक तितकाच त्यांचा अन्न मिळवण्याचा मार्ग शिकारी. Utricularia वर्गातील या वनस्पती सूक्ष्मजीवभक्षी असून यांच्या खोड आणि मुळांवर स्पर्शके आणि जठरे आढळून येतात. सभोवतालच्या पाण्यात पोहणारे सूक्ष्मजीव आदिजीव ही जठरे फसवून पकडतात आणि पचवतात. तर गवती दवबिंदूसारख्या वनस्पती कीटकभक्षण करतात. यांच्या हातासारख्या आणि दवबिंदुंसारख्या चिकट द्रवाने माखलेल्या स्पर्षकांवर अनेक कीटक आकर्षित होतात,चिकटून बसतात आणि मग वनस्पती त्यांना सावकाश पणे पचवतात कीटक आणि इतर जिवांकडून पोषणमूल्य मिळवण्याची ही पद्धती कितीही क्रूर वाटली तरी जगण्याच्या संघर्षामध्ये यांचे मूल्य सर्वाधिक आहे. तुतारी बंबाखू या वनस्पती मूळपरजीवी म्हणजेच रूट परासाईटआहेत. या वनस्पती दुसऱ्या वनस्पतींच्या मुळावर उगवतात आणि त्याचा अन्नरस शोषून घेतात. हरितद्रव्याची कमतरता असलेल्या वनस्पतींनी उत्परिवर्तने करून सड्यावरील जीवनशैलीशी जुळवून घेतलेलं अशाप्रकारे आढळून येतं. भुईचक्र ही वनस्पती ती तर फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग च्या काही भागात आढळून येते कंदीलपुष्प, चोहोळा यासुद्धा अशाच सुंदर पण प्रदेशनिष्ठ असणाऱ्या वनस्पती कोकणातील सड्यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागतील.
जसा पाऊस कमी होऊ लागतो आणि श्रावणाच्या उन्हांची चाहूल लागते तसे सड्यावरील वनस्पतीजीवन सुद्धा बदलू लागते. मान्सूनपूर्व फुलांची जागा आता तेरडा,सोनकी,कवळा,बरकी,ढालगोधडी, विष्णूकांती या सपुष्प वनस्पती घेऊ लागतात. तेरड्याचे निळे, सोनकीचे पिवळे, चांदणीपुष्पाचे जांभळे पट्टे सड्याला विविध रंगांनी माखून टाकतात तर फोडशी, कुर्डू, भारंगी,टाकळा, करिंदे अशा रानभाज्या हळूहळू खुलू लागतात.अतिशय कमी मीठमसाले लागणाऱ्या या रानभाज्या रसस्वादवर्धक,आरोग्यदायी आणि आर्थिक गणित सावरणाऱ्या म्हटल्या पाहिजे .
सड्यांवर असणारी डबकी,बावळे येथे मात्र पाणथळ वनस्पतींचे अधिराज्य दिसून येते. कुमुदिनी,कमळे, पाणतिळवण ही तर वार्यावर डोलताना अप्सरांचे नृत्य चालू असल्याचा आभास निर्माण करतात. अबोलिमा, भुईगेंद अपोनजेटोन अशा अनेक पाणथळ वनस्पती या डब्यक्याची शोभा वाढवतात. पावसाळा संपला की यातील अनेक वनस्पती सुकून जातात, त्यांच्या बिया किंवा कंद मातीत पडून राहतात तसेच अनेक प्रकारचे नेचे,शेवाळ, बुरशी अशा हजारो प्रजातींना या सड्यांना आपला अधिवास बनवला असून यातील अनेक वनस्पती प्रदेशनिष्ठ बरोबरच आय यु सी एन च्या रेड डाटा लिस्टमध्ये सुद्धा आहेत. हजारो प्रकारच्या कीटकांना परागीभवनासाठी आकर्षित करणे, फुलपाखरे,पतंग, अनेक कीटक यांच्या खाद्य वनस्पती म्हणून मोलाची कामगिरी बजावणाऱ्या या वनस्पती जीनपूल मध्ये सुद्धा मोलाची भर घालतात आणि आजूबाजूच्या फळबागांचे परागीभवन सुकर करून उत्पादन वाढ ही करतात.
पावसांच्या सरी बरोबर उगवणे आकर्षक फुलांची आरास मांडून परागीभवन करणाऱ्या किटकांना आकर्षित करणं, बीज किंवा कंदनिर्मिती करून पुढच्या पावसाची वाट पहात सुप्तावस्थेत जाणं हे जीवनचक्र संभाळत आजही कोकणातले कातळसडे त्यांच्या उद्धाराची वाट पाहात पहुडले आहेत. निसर्ग आधारित पर्यटन, उद्योग आणि खाणकाम यापासून संरक्षण, गुरेचराइ वर निर्बंध, बांधकामापासून मुक्तता मिळवून देणारा राम या सड्यांचा उद्धार करेल आणि आनंदाचा वर्षाव करणारी सीतेची आसवे पुढच्या वर्षी पुन्हा उमलतील या आशेवर आजचा कोकणातील सडा श्रावणोत्सव साजरा करत आहे.
किती सुंदर शब्दाविष्कार...अप्रतिम लिहिलेय...वाचतच राहावं असं लिखाण 👌👌
उत्तर द्याहटवा