Frogmouth च्या शोधात.....
Frogmouth च्या शोधात.....
बरेच दिवस रमाट गाडग्यातून वेळ निघत नव्हता, खूप बोअर झालं की मग आमचं रिफ्रेश होण्यासाठी जंगलात जायचं ठरतं. यावेळी मात्र शार्दुल नुकताच वनोशी ला जाऊन आला होता, आणि तिथं दिसलेले फ्रोगमौथ ट्रोगोन आपल्या जंगलात शोधायचे अस चॅलेंज घेऊन आलेला. त्यामुळे तयारी करण्यात ७ ८ दिवस गेले. श्रीलंकन फ्रोगमाउथ आणि ट्रोगो हे खरं तर सह्याद्रीच्या जंगलात अत्यंत दुर्मिळ रित्या मिळणारे पक्षी. जास्त करून southern western ghats मध्ये यांचे रेकॉर्ड जास्त आहेत. परंतु देवरूख परिसरात फिरताना बऱ्याच वेळेला यांचं अस्तित्व आवाज ऐकल्याच जाणवत होत. त्यावेळी पासूनच हे चॅलेंज घ्यायचं ठरत होत.शेवटी तो दिवस उजाडला, सुरुवात च गाडी पंक्चर होऊन झाली, थोडा वेळ गेला, परंतु जिद्द काय कमी झाली नाही. शेवटी ५.३० च्या सुमारास निघालो. पोचेपर्यंत सुर्य मावळतीकडे झुकला होता. शेवटची किरणं सह्याद्रीच्या कड्यांवरती पसरली होती. सुकलेल्या गवताने आणि सोनसळी उन्हाने तापलेले कडे सोनेरी भासत होते. गाडीने आता वेग घेतला होता. आमची मन मात्र त्या परिसरात केव्हाच पोचली होती. कल्पनांच्या विश्वतून जाग आली ती सर्प गरुडाच्या लांब लचक शीळ ऐकून. मग कडेच्याच झाडावर एक जोडी बसलेली दिसली. एकाच्या पायात नुकताच मारलेला साप होता. दरीच्या खालच्या अंगाला असलेल्या झाडावर बसून यांचं सांज भोजन आरामात चालू होत. उजेड कमी आणि कॅमेराला उगाच त्रास कशाला द्या म्हणून आम्ही थोडा वेळ पहात राहिलो आणि मग थोड्या वेळाने उरलेला नाशता पायात घेऊन मादीने दरी पलिकडे उड्डाण केले आणि आम्ही पुन्हा आमच्या मार्गाला लागलो.
एव्हाना काळोख पडू लागला होता, कोतवाल दयाळ झाडांच्या टोकावर बसून रियाझ करत होते. तांबट मधूनच कुजन करत होते. रान कोंबड्या चा नर कुठेतरी लांब शेंड्यावर बसून पुकारा करत होता. मंत्रमुग्ध वातावरण हळू हळू भीतीदायक होण्याची ही सुरुवात. काही मिनिटात काळोख पडला आणि अचानक भयाण शांतता पसरली.
आता अंधाराचं साम्राज्य पसरणार होत रातवे बाहेर पडले होते. त्यांचे एकमेकाला साद देण्याचे खेळ सुरू झाले होते. अचानक एका वळणावर वेगळ्या आवाजाने आमचं लक्ष्य वेधलं गेलं. शार्दुल च्या परिचयाचा आवाज असल्याने लगेच गाडीतून उतरलो आणि पायवाटेने निघालो. कडेलाच गव्याच शेण स्वागताला होत. परंतु येणारे आवाज आणि ते शोधण्याचं कुतूहल आम्हाला परत फिरू देणार नवत. आवाज अगदी कडेच्या झुडुपातून येत होते. त्याला प्रतिसाद चारही बाजूने येत होते. मंत्र मुग्ध होऊन आम्ही जागीच उभे स्तब्ध झालो. कारण आवाजच मूळ काही दिसेना. मग शोधाशोध सुरू झाली. जसा आवाज येई तसा शोध चालू १० एक मिनिटांनी मिट्ट काळोखात शेवटी फ्रोगमाऊथ महाशय नजरेस पडले आणि आमच्या आनंदला पारावार उरला नाही. बिन आवाजाचं हास्य चेहऱ्यावर होत. जोपर्यंत कॅमेराचा टप्प्यात येत नाही तो पर्यंत आवाज न करता पुढं सरकण आणि आवाजाच्या दिशेने वेध घेत राहणं एवढंच हातात होत. शेवटी कष्टाचं चीज झालं आणि एक नर अगदी समोरच येऊन बसला. एक दोन फोटो घेऊन आम्ही तिथून निघालो. शोध मोहीम यशस्वी झाली होती. इतकी वर्ष प्रतीक्षा यादीत असणारा हा पक्षी आता कॅमेरात चित्रबद्ध होता तो पण आमच्या भागात.
आता देवराई कडे निघालो. देवराई मंद चांदण्यात शांत पहुडली होती. ब्राऊन वुड आऊल ची सुंदर शीळ घुमू लागली होती. रात्वे कोरस देत होते. पेरीमिटर चेक करावा म्हणून बॅटरी मारली तर एक गवा समोरून धावत रस्ता ओलांडून गेला. आणि आम्ही पण तृप्त मनाने परतण्यास निघालो. मात्र घुबडाचे शांत गंभीर घुत्कार चांदण्याच शीतल रूप घेऊन पहुडलेला सह्याद्री स्वर्गासमान भासत होता. याहून अधिक काय हवं आयुष्यात....
shrilankan Frogmouth हा वेस्टर्न घाट मध्ये इंडिमिक असणारा पक्षी महाराष्ट्र कर्नाटक केरळ आणि श्रीलंकेत दिसून येतो. घुबड आणि रातवा यांचा संकर वाटावा असा हा पक्षी त्याच्या बेडका सारखा दिसतो. पूर्णतः निशाचर असल्याने आणि केमॉफ्लाज मुळे सहजा सहजी दिसत नाही. हे पक्षी फांदीवर चुपचाप बसून राहतात आणि त्या फांदी चा भाग असल्यासारखे होऊन जातात. पहाटे आणि संध्याकाळी यांचे आवाज ऐकूनच हा पक्षी शोधता येतो.आता पर्यंत याचा आढळ उत्तर कन्नड पर्यंत होता. परंतु काही वर्षा पासून मुंबई पर्यंत अस्तित्वाचे पुरावे निसर्ग प्रेमींना मिळाले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा