There is no happy ending

           खरंतर जंगलांची भटकंती म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीला बाजूला सारून निसर्गाच्या कुशीत अलगद विसवावे आणि सर्व ताणतणाव चिंता विसरून निसर्गदेवतेची मुक्तहस्ते होणारी उधळण संपृक्त नजरेने टिपून घेण्याचे साधन. देवरूख सारख्या तुलनेने शहराकडे वाटचाल करत असणाऱ्या गावात रहात असताना सुद्धा निसर्ग जरी पदोपदी भेटत असला तरी जंगल अनुभवण्यासाठी मात्र थोडी वाट वाकडी करावी लागतेच. आमच्या सुदैवाने सह्याद्रीची भली मोठी रांग अगदी १०-१५ किमी च्या अंतरावर असल्यामुळे कधीही उठून सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर भ्रमंती करणे हा तसा लहान असल्यापासूनचा विरंगुळा. पक्षीनिरीक्षण करण्यासाठी रानोमाळ फिरता फिरता या जंगलवाचनाची आवड आम्हाला केव्हा लागली हे कळलंच नाही. धुळीत उमटलेली प्राण्यांची पावले, बिबट्याच्या कातळावर टाकलेल्या विष्ठा, रानडूकरानी खाण्यासाठी उपटलेली मूळे, त्यांच्या लोळणी, सांबरांच्या शिंगाने खरवडलेल्या साली ते अगदी वनचरानी दबक्या पावलांनी पदोपदी चालून उमटवलेल्या रानवाटा शोधण्याच्या छंदाला ट्रॅप कॅमेराच्या वापराने नवीन उद्दिष्ट दिले. सह्याद्री परिसरातली जंगलं सुद्धा लहरी इथल्या पावसासारखी. शिखरावरील घनदाट सदाहरित पासून पायथ्याच्या पानझडी पर्यंतची प्रचंड विविधता ल्यालेली. डोंगरांच्या कुशीत उगम पावणाऱ्या नद्या, नाले, ओढे पावसाच्या पाण्याने दुथडी भरुन वाहतात, इथल्या वनस्पती जीवनाला सहारा देतात परंतु पावसाचे चार महिने संपले की मग मात्र हळूहळू हेच डोंगर उतार पाण्याचं दुर्भिक्ष्य होण्यास कारणीभूत ठरतात. मग मात्र साचून राहिलेले डोह, बारमाही वाहणारे ठराविक झरे, आणि दाट सावलीच्या जंगलातल्या ठराविक पाणवठे इथपर्यंत पाणीसाठा मर्यादित होतो. बरंचस प्राणी जीवन ही ह्या पाणवठ्याच्या अवतीभोवती केंद्रित होते. यामुळेच आमची भ्रमंती ही अनेकवेळा असे जंगलातले पाणवठे शोधणे आणि तिथे प्राणी जीवनाच्या खुणा शोधण्यात बदलून जाते. एखादी जागा शोधावी तिथे आपल्या मानवी अस्तित्वाच्या खुणा न उमटवता ट्रॅप कॅमेरा लावावा आणि गपचुप निघून यावे नंतर काही दिवसांनी जाऊन ते चेक करावे हे सध्या आमचं ठरलेलं रूटीन. हे करत असताना अनेक अनुभव येतात. कधी कधी तर कॅमेरा चेक करत असताना अगदी थोड्याच वेळापूर्वी इथे एखादा गवा पाणी पीत होता आणि आपली चाहूल लागून निघून गेला हे कळतं तर कधी एखाद भेकर आपली चाहूल न लागल्याने अगदी समोरून दर्शन देतं. पण बहुतेक वेळा मात्र जंगल दिसण्यापेक्षा ऐकूच जास्त येतं. भेकराच भुंकन, बिबट्याची साद, वानरांच खेकसणे, प्राण्यांची चाहूल लागताच केकाट्यांची ओरड, चान्यांची टिवटिव, कदाचित शेकरूची साद असे अनेक प्रसंग वेळोवेळी येतात. हे सगळेच अनुभव रोमांचित करणारे, भ्रमंतीची आस वाढवणारे सुखांत असणारे मन प्रफुल्लित करणारे. परंतु काही प्रसंग थरारक भीतीदायक आणि खऱ्या अर्थाने जंगलाचे दुसरे रूप आपल्यासमोर आणणारे असतात. असाच एक थरार अनुभवायला परवाच मिळाला. 


      नेहमी प्रमाणे आम्ही एका देवराई मध्ये फेरफटका मारावा, पक्षी पहावे, काही खुणा मिळाल्यास ट्रॅप कॅमेरा लावावा म्हणून फिरायला गेलो होतो. तशी दुपार होत आली होती. सुर्य अजून पूर्ण डोक्यावर आला नव्हता. ही देवराई तशी उंचीवर असली तरी दोन्ही बाजूने उंच पर्वत रांगेने वेढलेली आहे त्यामुळे सुर्य किरणे तशी इथे उशिराच पोहोचतात. आमची गाडी पोहोचता मलबार ग्रे हॉर्नबिलच्या शिळा सर्व बाजूने ऐकू येत होत्या. जंगलांमध्ये सुरमाड फळांनी लगडण्याचा हा सिझन असल्यामुळे ठिकठिकाणी ही फळे खाण्यासाठी हॉर्नबिल ची गर्दी झाली होती. गाडी लावून पायवाटेने बाजूच्या झाडीत शिरल्यावर अचानक मोठा आवाज करून सावलीत झोपलेला डुक्कर वेगाने समोरून दिसेनासा झाला. अचानक अगदी पुढ्यातून पळल्यामुळे आमची मात्र चांगलीच धकधक झाली. आता दुसऱ्या बाजूचा ओहोळ जो नदीला उतरत असावा आणि कुठं तरी एखादा डोह साठवून असावा की काय हे पाहण्यासाठी आम्ही तिकडे चालायला सुरुवात केली. नुकतीच जंगलतोड झाल्यामुळे ही नव्याने तयार झालेली वाट होती. सांबराच्या पाऊलखुणा धुळीत उमटलेल्या असल्या तरी त्यांचा काळ वेळ ठरवणे खूप अवघड होते. तो ओहोळ पूर्ण उतरून झाल्यावर नदीत उतरलो आणि गव्यांच्या कळपाच्या अस्तित्वाच्या खुणा आता पदोपदी दिसू लागल्या. पाणवठ्यावर आल्यावर यांचे मातीत खोलवर उठणारे खुर आणि मोठे गोल शेण सहज लक्ष्य वेधून घेतं. अशीच एक जागा बघून इथे ट्रॅप कॅमेरा लावला आणि देवळाकडे जाणारी वाट पुन्हा चढू लागलो. खरंतर ही वाट पायऱ्यांची सरळ उभी चढणीची दमछाक करणारी आणि दोन्ही बाजूने दाट झाडी झुडुपानी वेढलेली. पावसानंतर रान मोडी आणि इतर झुडुपे इतकी दाट वाढतात की अगदी पुढ्यात कोणी येऊन उभा राहिला तरी दिसणार नाही. आणि असच झालं. वाट संपून देवळाकडे पोचता पोचता सांबराच्या इशारा वजा आवाजाने अचानक आमचं लक्ष्य वेधून घेतलं. शांत गंभीर दुपारी आजू बाजूला कोणतेच आवाज नसताना हा आवाज नदीच्या दरीत खोलवर घुमला. आता समोर सांबर मिळू शकत या आशेने मन प्रफुल्लित झालं आणि पाठोपाठ कुई असा आवाजाने लक्ष वेधलं. पाठोपाठ पळताना पावलांचे सुक्या पांनात येणारे आवाज, झुडूपांची हालचाल असे अनेक आवाज अगदी समोरून यायला लागले. आम्ही चढणीने आधीच दमलेले त्यात अगदी शेजारी चालला असलेला हा थरार. तरीही अंगात असलेली सगळी ताकद कानात गोळा करून चालेल्या परिस्थितीचा आढावा घेणं सुरू झालं. ऐकू येणारी कु कू ही कुठल्या प्राण्यांची आहे हे एव्हाना चांगलंच कळून चुकलं होते. गेली दोन वर्षे अनेक गावात आम्ही लावलेल्या ट्रॅप कॅमेरा मध्ये या प्राण्यांच्या कळपाने वेळोवेळी दर्शन दिले होते. तेवढ्यात सांबराची किंकाळी ऐकु आली आणि हालचाल कमी झाली. आम्ही टवकारलेले कान सावरून थोड पुढे जाऊन कानोसा घ्यावा का या विचारात मग्न होतो. कारण ही सर्व धडपड हळूहळू आम्ही चढत असलेल्या पायऱ्यांच्या दिशेने सरकत होती आणि आमच्या अस्तित्वाची कल्पना या सर्वांना नसणार याची जाणीव आम्हाला सुद्धा होती. त्यामुळे एक मन इथेच दबा धरून बसू आणि वाट पाहू म्हणत होती तर दुसरे मन मात्र इथून पळ काढून देवळाच्या पलीकडे लावलेल्या गाडीमध्ये सहारा घेण्याच्या बाजूने होते. परंतु हे दोन्ही चॉईस अचानक संपले आणि पायऱ्या संपताच समोर असलेल्या अंगणाच्या पलीकडे जाळीत घुसण्याचा प्रयत्न करणारे सांबर आणि त्याचा पाठलाग करणाऱ्या रान कुत्र्याच्या मध्ये आपण दोघं उभे आहोत या जाणिवेने आम्ही जागीच थिजलो. रान कुत्र्याविषयी आतापर्यंत ऐकलेल्या वाचलेल्या सर्व कथा, गोष्टी क्षणार्धात डोळ्यासमोरून तळरून गेल्या. यांच्या शिकार करण्याच्या पद्धती, प्रसंगी वाघाला सुद्धा न घाबरण्याची निडर वृत्ती आणि कळपाचे सामर्थ्य यामुळे बेडर असलेला या प्राण्यांच्या शिकार मिळवण्याच्या मार्गात आता आम्ही दोघे थिजून उभे होतो. असे प्रसंग कधीही ओढवेल अशी शंका सुद्धा मनात कधी न आल्याने यावेळी काय करावं असा विचार तरी काय करणार त्यामुळे तसंही आम्ही जे काय होईल ते पाहूया या मोडवर डोळ्यांचा आणि थरथरणारे हातात फोटोचा कॅमेरा सेट करून उभे होतो. सांबरची मादी एव्हाना झुडुपात शिरली. तिचे पिल्लू मात्र तेवढे सुदैवी ठरले नाही. उडी मारण्याच्या प्रयत्नात ते झुडुपा च्या ओपनिंग च्या आधीच कोसलळे त्याच्या नाकातोंडातून रक्त येत होत. आम्हाला असे अचानक मध्ये बघून रानकुत्र्याने अचानक माघार घेतली आणि आमच्या सुदैवाने तो मागच्या वाटेने समोरच्या झाडीत गायब झाला. आता आमचा श्वास परत चालू झाला असावा कारण काय घडतंय आणि काय घडलेय याची आता कल्पना येऊन आमचे पाय समोरच्या देवळाच्या आवारात नकळत वळले होते. देवळाचे बांधकाम चालू असल्यामुळे सर्वत्र चिरे वाळू खडी आणि इतर सामान पडलेलं होत. मंदिर सुद्धा बांधकाम चालू असल्यामुळे पाडलेल त्यामुळे तशी लपण्याची जागा म्हणजे काय तो शेजारच्या इमारतीत असलेला आडोसा. जेमतेम दोन फूट उंचीचे बांध बाकी सगळं उघड असणारी ही इमारत. त्यामुळे मनात धाकधूक घेऊन आम्ही तिथे वाकून बसलो. सांबारच पिल्लू उठण्याचा प्रयत्न करत होत पण थकल्यामुळे त्याच्या शरीराने केव्हाच साथ सोडली असावी. रान कुत्र्याच्या कळप बाजूला असणार या भीतीने आमची हालचाल सुद्धा थिजली होती. मग सुरू झाला तो वाट बघण्याचा काळ. खरं तर अशी वेळ ही मानसिक आंदोलनाची असते. गलित गात्र होत आलेल्या त्या पिल्लाला पाणी तरी द्यावे, मोठं मोठे आवाज करून रान कुत्र्याच्या कळपाला हाकवून लावावे की इथून धाव घेऊन गाडी गाठावी आणि सरळ खालचे गाव गाठावे असे अनेक विचार मनात येत होते. झुडुपात येणारे आवाज ऐकून किती कुत्रे असावेत याचा अंदाज बांधणे पण एका कानाने सुरू होते. असाच अर्धा तास निघून गेला. कदाचित कुत्र्यांना आमचे अस्तित्व जाणवत असावे. हळूहळू आवाज थांबले आम्ही जाऊन सांबर पाहिले ते खूप धापावले तर होतेच पण जखमी सुद्धा होते. आमच्या जवळ होत नव्हतं तेवढं पाणी त्याच्या अंगावर ओतणे एवढंच आम्हाला सुचत होत. त्याने फारसा परिणाम झाला नाही त्या सांबराने डोळ्यासमोर च या जगाचा निरोप घेतला. हतबल चेहऱ्याने आम्ही पुन्हा देवळात येऊन बसलो. बराच वेळ कोणीच आले नाही. झुडुपात एका प्राण्यांचे दबकत सरकण्याचे आवाज येत होते. परंतु बाहेर कोणीच येत नव्हत. शेवटी ट्रॅप कॅमेरा लावून तिथून जायचा बेत आम्ही ठरवला. एव्हाना तीन वाजले होते. नेटवर्क नाही आणि जंगलात येऊन झालेले पाच तास यामुळे घरून शोधाशोध सुरू होण्या आधी संपर्क कक्षेत पोहोचणे गरजेचे होते. जडवलेल्या मनाने तिथून निघालो. ट्रॅप कॅमेरा मुळे पुढे काय घडणार हे कळेल याची शाश्वती होती परंतु बॅटरी कमी होती म्हणून परत एकदा संध्याकाळी येऊन बघावं लागणार होते. तसेच कोणी माणसे किंवा कामगार इथे फिरकले तर मग काहीच मिळणार नाही याची भिती होती. म्हणून काळोख पडण्याआधी परत आलो.  कॅमेरा


अगदी उत्साहाने धावत जाऊन च काढला. कारण समोर सांबर खाल्लेलं दिसत होतम त्याची आतडी बाहेर ओढून काढलेली होती. पोटकडून फाडून आतलं मांस खालेल दिसत होत. लॅपटॉप मध्ये पहिलाच रान कुत्रा दिसला आणि मन शांत झालं. शेवटी जिवो जिवस्य जीवनम नियम असलेल्या शिकारीत आम्ही मध्येच टपकलो होतो. सांबर तर वाचवू शकत नव्हतो मग कमीत कमी ज्याने शिकार केली त्याच्या तोंडी तरी ती लागावी अशीच भावना आमची होती. ती साध्य झाल्याचं दिसतं होत. आता सकाळी पुन्हा माणसे यायच्या यात कॅमेरा घेऊन जाऊ असे ठरवून आम्ही घरी आलो. डुक्कर बिबट्या सहज दिसणाऱ्या भागात असल्यामुळे रात्री खूप काही घडणार याची खात्री होती तश्या भरात जाऊन कॅमेरा चेक केला तर १३० व्हिडिओ आले होते पण सगळे काळे... इन्फ्रा रेड ने दगा दिला होता. संध्याकाळी ७ ते अगदी पहाटे ५ पर्यंत अनेक व्हिडिओ रेकॉर्ड झाले होते परंतु डार्क... आता काहीच कळणार नव्हतं. ज्या तंत्रज्ञानाने एवढी चित्रे दिले तेच ही कहाणी अपूर्ण राहण्यात हातभार ठरलं होत... तसंही प्रत्येक गोष्टीला सुखांत नसतोच... 

There is no happy ending to evey story.…



टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट