लक्ष्मीचे वाहनच आले धोक्यात....
🎉🎉........दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....... 🎉🎉
भारतीय संस्कृती एवढी उत्सव प्रिय संस्कृती जगात क्वचितच असेल. वर्षभर विविध सण व्रत वैकल्ये समारंभ साजरे करत असल्यामुळे इथले जिवन उत्सवप्रिय आणि आनंददायी बनले आहे. दिवाळी ला खरतर सणांचा राजा म्हटलं पाहिजे. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात. दिव्यांचा उत्सव असल्यामुळे संपूर्ण भारतवर्ष रोषणाई मध्ये न्हाऊन निघतो. गोठ्यातील गुरे वासरे, ते अगदी भाऊबीज सर्वच आनंदी. व्यापारी वर्गात लक्ष्मी पूजन आणि हिशेबाच्या वह्यांचे पूजन करण्यात येत असल्यामुळे या सणाला अपरंपार महत्व आहे. अश्या मंगलमय सणाला मात्र काही वर्षात शिकारीची काळी किनार वेढत असल्याचे दिसून येत आहे. लक्ष्मीचे वाहन मानले जाणारे घुबड आधीपासूनच विविध अंधश्रद्धा आणि गैर समजुतीन घेरलेले. त्यात दिवाळीच्या दरम्यान घुबड पकडून त्याचे बळी देण्याची प्रथा मनाला व्यथित करणारी तर आहेच परंतु या मंगलमय वातावरणाचे औचित्य भंग करणारी सुद्धा आहे.
घुबड एक विस्मयतेचे वलय असणारा पक्षी. मुख्यतः निशाचर असणारा, कडे कपारी, सोडलेल्या इमारती, वस्तीपासून विलग असणारे परिसर अश्या ठिकाणी मुख्यतः वास्तव्य करत असल्यामुळे अनेक गैरसमजुती या पक्ष्याबाबत लोकांच्या मनात घर करून आहेत. खरं तर काळे जादू करणारे भोंदू मांत्रिक, वैदू आणि इतर औषधी व्यवसाय करणारे मांत्रिक घुबडाला वर्षभर पकडून त्याचे अवयव, पिसे, हाडे यांचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे अलीकडच्या काळात वर्षभर शिकारीला सामोरे जावे लागत असले तरी दिवाळी च्या काळात ही शिकार शिखरावर पोचते असे अनेक वन्य जीव प्रेमीचे मत आहे. लक्ष्मी देवीचे वाहन मानले जाणारे घुबड अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन लक्ष्मी घरात टिकून राहावी यासाठी बाकी दिले जाते. उत्तर भारतामध्ये तर ही प्रथा अगदी खेडोपाड्यात पोचलेली आढलुन येते. इंडियन ईगल आवुल हे सर्वाधिक शिकार आणि तस्करी होणारी प्रजाती असल्याचे पक्षी अभ्यासक नमूद करतात. तर आंतर राष्ट्रीय तस्करीमध्ये ब्राऊन फिश आवूल आणि इंडियन स्कोप आवुल यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही घुबड पिंजऱ्यात बंदिस्त करून पाळण्यासाठी युरोप आणि इतर देशांमध्ये पाठवली जातात असा अंदाज आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार इंडियन ईगल आवुल ही प्रजाती सर्वाधिक तस्करी होणारी प्रजाती ठरली आहे. (ARCC)
कोकणात सुद्धा घुबडा विषयी अनेक समजुती आहेत. घुबडाचा घुत्कार ऐकला की मृत्यू येतो अश्या गैरसमजुती तून दगड मारून हाकलले जात असल्याचे लहानपणी खूप वेळा पाहीले आहे. तसेच घुबडाला दगड मारले की ते तो चोचीत पकडून घेऊन जातो आणि नदीवर नेऊन घासतो जसे दगड झिजतात तसा माणूस ही झिजून मरतो वगैरे. स्मशानात शांतता असल्यामुळे असणारे वास्तव्य यांना काळी जादू शी जोडते. शुभ अशुभ च्या संकल्पना आणि चालीरीती मध्ये घुबड दिसणे हे अपशकुन मानले गेले असल्यामुळे याच्या वाट्याला सततची अवहेलना च येते.
प्रत्यक्षात मात्र घुबड कुळ अत्यंत प्रगत आणि सुंदर पक्षी आहे. भारतात जवळ जवळ ३० प्रजातीची घुबड आढळतात. निशाचर असल्यामुळे अत्यंत तीक्ष्ण नजर, तीक्ष्ण ऐकण्याची क्षमता, उडताना आवाज सुद्धा येणार नाही असे पंख, नखे आणि चोच हे यांना घातक आणि यशस्वी शिकारी बनवतात. छोटे पिंगळे ते ईगल आवुल अश्या विविध आकारात घुबडे आहेत. गव्हाणी घुबड ठीपकेवाला पिंगळा तर अनेक शहरी भागात सुद्धा सहज दिसून येतो. तर फिश आवूल देवराया नदीकाठच्या परिसरात दिसतात. झाडाच्या ढोली आणि कपारी मध्ये घरटे बनवून त्यात पिल्लं जन्माला येतात. नर आणि मादी दोघेही पिल्लाची पालन पोषणाची जबाबदारी पार पाडताना दिसतात. वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार घुबड ही संरक्षित प्रजाती आहे. अनेक वर्ष दुर्मिळ असलेला आणि नष्ट प्राय मानण्यात आलेला वन पिंगळा अलीकडच्या काळात पुन्हा दिसून आला आहे. आणि या वन पिंगळ्यास महाराष्ट्राचा राज्य पक्षी बनवावा अशी चळवळ सुद्धा आकाराला येते आहे.
चांदण्या रात्रीला थंडावल्या जंगलात दूरवरून येणारा वूड आवुल चा आवाज ऐकण्यात मिळणारे समाधान जर अनुभवायचे असेल तर ही प्रजाती टिकवून ठेवणे गरजेचे आहे.दिवाळी सारख्या मंगलमय समयी दिवे लावताना अज्ञानाचा अंधकार दूर होऊन घुबडासारख्या अंधश्रद्धेचा बळी पडत असणाऱ्या पक्षाच्या अडचणी दूर व्हावेत हीच प्रार्थना करूया आणि दिवाळीच्या शुभेच्छा देऊया…..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा