फुलपाखरांची आगळी वेगळी दुनिया भाग एक
फुलपाखरे जवळ जवळ जगभर आढळणारा सुंदर पंख आणि रंग संगतीनी आपले लक्ष्य सहजरीत्या वेधून घेणारा नाना रंगात नाना आकारात दिसणारा एक छोटासा जीव. फुलपाखरे आवडत नाहीत असा माणूस सुद्धा तसा विरळाच. लहान मुले तर अगदी निष्पाप भावनेने फुलपाखरांच्या मागे
धावताना दिसतात, बागेत फुलांवर बागडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे मनाला मानसिक शांती समाधान देऊन जातात. अशा या जिवाविषयी फारच कमी माहिती आपल्या सर्वांना असते. फुलपाखरांचा जीवन क्रम, त्यांचे खाद्य, त्यांची संख्या, हवामान बदलाचा फुलपाखरांच्या संख्येवर होणारा परिणाम, त्यांचे पर्यावरणीय महत्त्व या सर्वांच्या बाबतीत तशी जागृती अतिशय कमीच आहे. फुलपाखरे अवघं काही महिन्यांचं आयुष्य असणारा जीव.. या अल्प काळात जगणं, फुला फुलांच्या वनात बागडण, झाडाचं आयुष्य फुलवण, आपल्या नव्या पिढीची सुरुवात करून देणं आणि या सर्वातून सर्वांना आनंद देणं... अश्या जीवनक्रम असल्यामुळे तशी अनेकदा सजीव म्हणून फुलपाखरे दुर्लक्षित राहिली आहेत. अलिकडच्या काळात मात्र वैज्ञानिक प्रगती, कॅमेरा आणि फोटोग्राफी मध्ये झालेल्या सुधारणा, आणि पर्यावरणीय अभ्यासाच्या नवीन पद्धती यामुळे फुलपाखरांचा अभ्यास दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यातून अनेक अत्यंत रंजक गोष्टी आपल्यापुढे आल्या आहेत.
प्राणी जगताच्या कीटक संवर्गामध्ये lepidoptera कुळामध्ये फुलपाखरे आणि पतंग यांचा समावेश होतो. सर्वात जुन्या जीवाश्मांचा विचार केला सुमारे १९० मिलियन वर्षांपूर्वी आढळलेले जुरासिक काळातील archeolepis नावाच्या छोट्या पतंगाचे जीवाश्म हे फुलपाखरांचे पूर्वज मानले जातात. तसेच फुलपाखरे पतांगांपासून उत्क्रांत झालेली असावीत या गृहितकाला बळ देणारी ठरतात. जगातील सर्वात पुरातन फुलपाखरू ३४ मिलियन वर्षापूर्वी पृथ्वीवर वावरत असल्याचा एक अंदाज आहे. पतंग आणि फुलपाखरे अगदी जवळची नातेवाईक असली तरी यांच्यात अनेक फरक आढळतात. बहुतांशी फुलपाखरे ही दिवसा वावरत असतात तर पतंग रात्री. फुलपाखरांचे संवेदनाग्र (antenna) हे क्लब च्या आकाराचे असतात तर पतांगांचे काटेरी फांद्या फांद्या असणारे. फुलपाखरांचे शरीर काटक शिडशिडीत असते तर पतांगांचे मांसल. फुलपाखरे जमिनीवर उतरल्यानंतर किंवा विश्रांती घेत असताना पंख मिटून घेतात तर पतंग त्यांचे पंख उघडलेल्या स्थितीत ठेवतात. दोन्ही गटात अनेक अपवाद असेल तरी ढोबळमानाने फुलपाखरे आणि पतंग हे वरीलप्रकारे वेगवेगळे ओळखता येतात. सपुष्प वनस्पतींनी केलेली उक्रांती आणि आधुनिक फुलांची रचना यामुळे फुलपाखरांची शरीर रचना प्रभावित झाल्याचे आपल्याला आधळून येते. त्याचबरोबर जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी फुलपाखरे पूर्णतः वनस्पतींवर अवलंबून असल्यामुळे वनस्पती आणि फुलपाखरे यांच्यात सहज सबंध निर्माण झाला आहे. अनेक फुलांची रचना आणि फुलपाखरांच्या सोंडा एकमेकास पूरक ठरतील अश्या रीतीने उत्क्रांत झालेल्या सुद्धा निसर्गात दिसून येतात.
फुलपाखरांचे शरीर प्रामुख्याने तीन भागात विभागलेले दिसते. डोके, छाती (thorax) आणि पोट( abdomen). प्रौढ अवस्थेत फुलपाखरे फक्त द्रव पदार्थ ग्रहण करत असल्याने त्यांच्या तोंडाचे रूपांतर हे रस शोषून घेणाऱ्या शुंडिके मध्ये झालेले दिसते. घडी होणारी ही सोंड प्रजाती नुसार कमी जास्त लांबीची असते. मुख्यतः ज्या फुलाशी नेक्टर घेण्यासाठी त्या फुलपाखराचा सबंध असतो त्या फुलाच्या रचनेशी सोंडेची लांबी सुसंगत असते. कुंचल पाद कुळातील फुलपाखरे गंध आणि चव ओळखण्यासाठी त्यांच्या पायावर असणाऱ्या ब्रश सारख्या रचनांचा वापर करतात. तर संयुक्त डोळ्यांमुळे फुलपाखरांना रंगांची ओळख तर होतेच, पण मुख्यतः फुलांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मधुरस मिळवण्यासाठी या डोळ्यांची रचना अत्यंत महत्त्वाची आहे. लाल भडक रंग फुलपाखराना अधिक आकर्षित करतात असा अंदाज आहे. पण मुख्यतः भडक रंग आणि सुवासिक फुले फुलपाखरांना अधिक आकर्षित करतात. अनेक फुले आपल्या कडा जाडसर करून फुलपाखरांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करतात तर मधुपान होता होता परागकण त्यांच्या शरीराला चिकटतील अशी रचना अनेक फुलांमध्ये दिसून येते. फुलपाखरे एका फुलावरून दुसऱ्या फुलावर मधुरस पिण्यासाठी जाताना परागीभवन होण्याचा सुप्त हेतू अश्या रीतीने पूर्ण होतो. आणि बक्षीस रुपात फुलपाखरांना शर्करा युक्त आणि ऊर्जा मिळवून देणारा मधुरस मोठ्या प्रमाणात मिळतो. जनुकीय जैव विविधता टिकून राहण्यासाठी क्रॉस पोलिनेशन अत्यंत महत्त्वाचे असते आणि झाडे फुलपाखरांकरवी आपला जेनेटिक पुल टिकवून ठेवतात. अनेक झाडांनी आपल्या फुलांचे आकार सुसंगत होण्यासाठी लहान, उंच, वरील भाग सपाट असेल असा, आणि गुच्छ रुपात केलेला आढळतो. अश्या पद्धतीने फुलपाखरे आणि वनस्पती यांच्यात वर्षानुवर्षे चालणारे सहजीवन विकसित झालेले आढलून येते.
परिसरात असणाऱ्या वनस्पतींच्या प्रजाती आणि फुलपाखरांची संख्या यांचा सुद्धा परस्पर सबंध असलेला दिसून येतो. समशीतोष्ण हवामान असणाऱ्या प्रदेशात वर्षभरात फुलपखरांच्या एकाहून अधिक पिढ्या एका वर्षात जन्म घेतात तर थंड हवामानात जिथे कडक हिवाळ्यात वनस्पती जीवन कमी झालेले असते अश्या ठिकाणी एका पिढीला सुद्धा एक वर्षाहून अधिक कालावधी लागू शकतो. हवामानाचा परिणाम फुळपखरांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणावर होतो. अधिक पावसाच्या काळात असणारी फुलपाखरांची संख्या कमी पावसाच्या काळात वाढते आणि पुन्हा थंडी आणि उन्हाळ्यात पुन्हा कमी होते. हवामान बदलाचे परिणाम म्हणून येणारी वादळे, अकाली पाऊस आणि अती थंडी सुद्धा संख्या रोडवण्याचे एक कारण ठरते. त्यामुळे फुलपाखरांना उत्कृष्ट हवामानाचे आणि सुदृढ पर्यावरणाचे दर्शक प्राणी म्हणून मानले जाते. बदलत्या ऋतुप्रमाणे फुल पाखरांचे अनेक मॉर्फस सुद्धा दिसून येतात. ओल्या काळात भडकसर असणारे wet season morphs कोरड्या काळात सुकलेल्या पालपाचोळ्या ला सुसंगत असे dry season morphs धारण करताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक फुलपाखरांचे पंख हे सुका पाला पाचोळा आणि सभोवतालच्या परिसराला मिळताजुळता असलेले आढलतात या गुणधर्माला केमोफलाज किंवा मायावरण असे म्हटले जाते. भक्षकांपासून संरक्षण मिळवण्याच्या दृष्टीने हा बदल अत्यंत महत्त्वाचा असतो. तसेच पंखावर असणारे मोठाले डोळे, भडक रंग संगती दर्शवून अपोसमेटीझम गुणधर्माचा वापर सुद्धा करतात. तर काही फुलपाखरे दुसऱ्या विषारी फुलपाखरांचे परिवेश धारण करून भक्षकांची फसवणूक करतात. आणि काही फुलपाखरे आपल्या अळी अवस्थेत खाल्लेले रासायनिक पदार्थ प्रौढावस्थेत सुद्धा शरीरात साचवून बेचव आणि विषारी बनलेली दिसून येतात. वेगवान आणि ठराविक पॅटर्न नसणारे उड्डाण, रासायनिक संरक्षण, मिमिक्री, छदमावरण असे अनेकविध गुणधर्म वापरून आपले संरक्षण फुलपाखरे करत असतात.
टायगर ,मोनार्क ,पेंटेड लेडी सारखी फुलपाखरे हवामान बदलानुसार स्थलांतर करतात. भारतात टायगर आणि क्रो फुलपाखरांचे मान्सूनच्या पावसाशी निगडित स्थलांतर आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि पाऊस कमी झाला की पूर्वेकडून परत पश्चिमेकडे असे पाहायला मिळते. तर मोनार्क ही अमेरिकेत आढळणारी फुलपाखरे उत्तर अमेरिका ते दक्षिण अमेरिका असे स्थलांतर करताना मोठ्या आढळून येतात. पेंटेड लेडी फुलपाखरू एकाहून अधिक पिढ्या जन्माला देत जगभर स्थलांतर करत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. अनेक प्रजातीच्या वास्प ह्या सुद्धा आपल्या प्रजननासाठी फुलपाखरांवर अवलंबून आहेत. अनेक परासाइट्स आणि parasitoids आपली अंडी फुलपाखरांच्या जिवंत अळ्यांच्या शरीरात देतात आणि wasp ची पिढी झोंबी केलेल्या या सुरवंटाना जिवंत पोखरत आपली वाढ साधतात. अनेक फुलपाखरांच्या अळ्या या शेतीसाठी हानिकारक ठरतात. तसेच अनेक भक्षक फुलपाखरांचे सुरवंट खात असल्याने अन्न साखळीत यांचे महत्त्वाचे स्थान आहे. ब्लू कुळातील फुलपाखरांच्या सुरवंटानी काही प्रजातीच्या मुंग्यांशी सहसंबंध प्रस्थापित केले आहेत. आपल्या शरीरातून स्त्रवणाऱ्या हनी ड्यू या गोडसर शर्करेने युक्त स्त्रावाच्या बदल्यात मुंग्यांकडून संरक्षण मिळवण्याचा मोबदला या सहसंबंधात मिळवतात. तर काही प्रजातीचे सुरवंट माव्या सारख्या दुसऱ्या कीटकांना खाऊन त्यांची संख्या कमी करण्यास हातभार लावतात. तर काही सुरवंट अँट कॉलनी मध्ये शिरकाव करून मुंग्यांची अंडी खातात. अश्या पद्धतीने अनेक किटकांशी फुलपाखरांचे सहसंबंध प्रस्थापित झालेले निसर्गात दिसून येतात.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा