या चिमण्यांनो परत फिरा रे...




 आमचं जुन घर म्हणजे टीपिकल कोकणी होते. ओटी पडवी माजघर. भिंती मापाच्या. पुढे झोपाळा आणि मागे परस दार.लहानपणी आमची आजी भाताचे तांदूळ निवडायला अंगणात बसत असे. सुपातले तांदूळ जसे पाखडू लागे तसें चिमण्याचे घोळके लगेच जमा होत. चिव चिवचिव करत उड्या मारत दाणे टिपणारे ते जीव आजही चांगले स्मरणात आहेत. जुनी घरं बदलली आणि चिमण्या कुठे गेल्या हो?

        बाजारात रेशन दुकान, धान्य गोदाम आणि आठवडा बाजार हे चिमण्या दिसण्याची हमखास ठिकाण होती. सहज फेरफटका मारायला बाहेर पडलो आणि पायवाटे वरच्या धुळीवर पडलेले दाणे टिपणारी चिमणी आज मात्र दिसेना झालेय. का झालं असावं असं. २० मार्च ला दर वर्षी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो. त्या निमित्ताने चिमणीच्या सद्यस्थिती वर आपण थोडा विचार विनिमय करावा म्हणून इथे लिहित आहे.

         १९५८ ला माओ ने चीन मध्ये घटणाऱ्या धान्य उत्पादनाला चिमण्यांची वाढती संख्या कारणीभूत आहे असा निष्कर्ष काढून चिमण्या नष्ट करण्याचा आदेश काढला होता. लोकांनी त्याची आज्ञा शिरसावंद्य मानून दिसतील तिथून चिमण्या मारायला सुरुवात केली त्यांची घरटी मोठ्या प्रमाणात नष्ट केली गेली. जशी चिमण्यांची

संख्या रोडावली तशी मग टोळ धाड आली कारण त्यांना खाणाऱ्या चिमण्या च आता उरल्या नव्हत्या. आणि धान्य उत्पादन वाढ होणं एेवजी नुकसानच जास्त झालं. आणि याची परिणीती ६० सालातल्या मोठ्या दुष्काळात झाली. 

असं हे चिमणी च महत्व. 

           चिमणी म्हणजेच हाऊस स्पारो. हिचा आढळ तसा जगभर. १६ सेमी लांबी आणि २० ते ३० ग्राम वजनाचा हा छोटा पक्षी भारतीय संस्कृतीत मात्र अगदी जवळचा. इतका की लहान पणी हा घास काउ चा आणि हा घास चिऊ चा करत सर्वांचंच बालपण गेलं असतं. लोकवस्ती, शहरी भाग इथे प्रामुख्याने आढळणारा हा पक्षी जंगलं,बागा, गवताळ मैदानं पासून अगदी वाळवंट आणि बर्फाळ प्रदेशात ही आढळतो. कदाचित म्हणूनच सर्व संस्कृतीत याचं महत्त्व आहे. जवळजवळ दहा हजार वर्ष माणूस आणि चिमणी सहजीवन सुरू असल्याचा एक अंदाज आहे.

      परंतु गेल्या काही वर्षात चिमण्यांची संख्या जगभरात झपाट्याने खालावते आहे.आयु सी एन संस्थेने 2002 यावर्षी चिमणीला सर्वप्रथम संकटग्रस्त कॅटेगरीमध्ये समाविष्ट केले.म्हणूनच 2010 सालापासून जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात येतो. 2012 वर्षी दिल्लीने तर 2013 ला बिहार ने चिमणीला राज्यपक्षी घोषित केले.

जसजशी प्रगती होत गेली तसतशी शहरांचे राहणीमान ही बदलत गेले जुनी कौलारू घरं जाऊन आता सिमेंटचे बंगले उभे राहिले. मोकळ्याढाकळ्या खिडक्या जाऊन आता काचेच्या बंदिस्त खिडक्या आल्या एसी आले आणि खिडकीत घरट्याची जागा मात्र कायमची गेली. शहरीकरणाचा अजून एक परिणाम म्हणजे झाडांची घटलेली संख्या. बागांमध्ये झाडां ऐवजी शोभेची झाडं वापरली जाऊ लागली आणि आणि गवत इतर तृणधान्य रानफुलं कायमची गायब झाली की जी चिमणीचा मुख्य आहार होती. एकूणच घरटी बांधण्यासाठी कमी जागा आणि अन्नाची कमतरता ही ही चिमणीची संख्या कमी होण्याची मुख्य कारणे आहेत. झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड झाली याचा परिणाम चिमणीला घरट्यासाठी आवश्यक जागा कमी झाल्या. तसेच बंदिस्त नाले कीटकनाशकांचा वापर यामुळे पिल्लांना भरण्यासाठी लागणारे किडे कृमी कीटक यांची संख्या कमी झाली. ध्वनि प्रदूषण, खिडक्यांवर ती ग्लास पॅनल चा उपयोग आणि मोबाइल टॉवरची वाढती संख्या ही सर्व कारणे एकंदरीतच पक्षी जीवन धोक्यात आणणारी आहेत. मोबाईल टॉवर मुळे त्यांच्यातल कम्युनिकेशन बिघडत असा अभ्यास आहे. त्याच बरोबर शहरांमध्ये कबूतर आणि पोपट यांना केले जाणारे फीडिंग आणि त्यांची वाढलेली संख्या हीसुद्धा चिमणीच्या लोकसंख्येशी स्पर्धा करणारी ठरली आहे एकाच हॅबिटॅट मध्ये या नवीन वाढलेल्या शहरी पक्षांची संख्या हि पुरक ठरण्याऐवजी काहीच जातींना मारक ठरली आहे.

सह्याद्री निसर्ग मित्र कोकणामध्ये 2005 पासून चिमणी गणना करत आहे. यात शहरी भागांमध्ये चिमण्यांची संख्या हळूहळू वेगानी वाढताना दिसते तर ग्रामीण भागामध्ये मात्र कमी होताना दिसते 

आता याविषयीचे उपाय काय करता येतील यावरती थोडसं.सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर बांधणी करताना चिमण्या किंवा इतर पक्षी यांनाही सहजीवन आणि जगता यावे यासाठी थोडेसे प्रयत्न करू शकतो जुन्या पद्धतीच्या खिडक्या काचेचा कमीत कमी वापर किंवा कृत्रिम घरटी बसवून या मुक्या जीवांना आपल्या घरांमध्ये आपण स्थान देऊ शकतो. आपल्या बगीच्यामध्ये पाणी आणि धान्याचे फिडर लावून थोड्या प्रमाणात का होईना पण या पक्षांना मदत करणे शक्य आहे. कृत्रिम घरटी कशी असावीत याची इंटरनेट वरती सुद्धा मोठ्या प्रमाणावर ती माहिती उपलब्ध आहे किंवा अशा पद्धतीची घरटी बांधण्यासाठी चे मार्गदर्शन सह्याद्री निसर्ग मित्र सुद्धा करत आलेली आहे. पक्षीमित्रांनी शाळा महाविद्यालय आणि आणि इतर नागरिकांचे सहकार्य घेऊन कृत्रिम घरटी पाणी पिण्यासाठी आणि बर्ड फिडर यांची शहरांमध्ये सोय करावी. वेळोवेळी चिमणी गणना करण्याची आवश्यकता आहे तसेच चिमणी संवर्धनासाठी उपयुक्त एक्शन प्लान ठरवण्याची सुद्धा आवश्यकता आहे वेळीच लक्ष देऊन या बाबी केल्या गेल्या नाहीत तर खरोखरच चिमणी ही आपल्या कथा कादंबऱ्यांमध्ये आढळेल आणि मग आपल्याला म्हणावं लागेल या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपल्या......

©Prateik more

अधिक माहिती साठी संपर्क.

सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण

Phone: +91-2355-253030, 

Nitin Narvekar 9021944235

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट